पटना : दिवंगत नेते रामविलास पासवान यांचं श्राद्ध 20 ऑक्टोबर रोजी रोजी पटना येथे झाला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार, चिराग पासवान आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे देखील एलजेपी कार्यालयात हजर होते.
घटनास्थळी पोहोचलेल्या नितीशकुमार, तेजस्वी यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी रामविलास पासवान यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमात नितीशकुमार पोहोचताच चिराग पासवान यांनी त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतला. या दरम्यान नितीशकुमार यांनी चिराग पासवान यांच्या आई यांची ही भेट घेतली.
रामविलास पासवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे समर्थक आणि चाहते मोठ्या संख्येने जमले होते. बिहारमधील निवडणूक काही दिवसांवर असताना सर्व राजकीय पक्ष निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. एलजेपीचे कार्यालय व्हीलर रोड विमानतळाजवळ आहे. संध्याकाळी निवडणूक प्रचारातून परत आल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार प्रथम एलजेपी कार्यालयात पोहोचले जिथे रामविलास पासवान यांचे छोटे भाऊ आणि हाजीपूरचे खासदार पशुपती कुमार पारस यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पशुपती कुमार पारस यांची भेट घेतली आणि शोक व्यक्त केला. विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव निवडणूक प्रचारातून पटना विमानतळावर परतल्यानंतर थेट एलजेपी कार्यालयात पोहोचले.
मुख्यमंत्री नितीशकुमार, पशुपती कुमार पारस आणि तेजस्वी यादव एकत्र बसले आणि त्या दरम्यान एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आणि तिन्ही राजकीय नेते एकत्र आले. बिहारमध्ये राजकीय वाद आणि टीका सुरु असताना कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर मात्र सुख-दुखाच्या प्रसंगी सर्व जण राजकारण बाहेर ठेवून एकत्र येतात ही समृद्ध परंपरा आहे.
अलिकडच्या काळात चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात सातत्याने आघाडी उघडली आहे. तर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आधीच मुख्यमंत्री नितीशकुमार आणि एनडीएवर निशाणा साधत आहेत. एनडीएमधून चिराग पासवान यांनी वेगळी भूमिका घेत स्वबळावर यंदा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीशकुमारांवर सतत टीका करणं सुरु ठेवलं आहे. पण या दु:खाच्या प्रसंगी मुख्यमंत्री नितीशकुमार हे राजकीय वाद बाजुला ठेवून एलजेपी कार्यालयात पोहोचले. त्यामुळे बिहार निवडणूक तोंडावर असताना एक वेगळं सकारात्मक चित्र यावेळी एलजेपीच्या कार्यालयात पाहायला मिळालं.