'पराभवाचा राग संसदेत काढू नका', हिवाळी अधिवेशनात पंतप्रधानांनी विरोधकांना डिवचलं

Parliament Winter Session 2023 : संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात माध्यमांना संबोधित केले. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांना टोला लगावला.

आकाश नेटके | Updated: Dec 4, 2023, 11:26 AM IST
'पराभवाचा राग संसदेत काढू नका', हिवाळी अधिवेशनात पंतप्रधानांनी विरोधकांना डिवचलं title=

Parliament Winter Session : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मोठं यश मिळालं आहे. मध्य प्रदेश, छत्तीगड आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये भाजपाने (BJP) एकहाती सत्ता मिळवली आहे. तर तेलंगणात काँग्रेसला यश मिळालं आहे. दुसरीकडे, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशाला सुरुवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पराभवानंतर विरोधकांना टोला लगावला आहे. पराभवाचा राग अधिवेशनात काढू नका असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना दिला आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात एकूण 19 विधेयके सभागृहात मांडली जाणार आहेत. या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आलेल्या पंतप्रधान मोदींनी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधला. 'राजकीय हालचाली वेगाने वाढत आहेत. काल चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले. परिणाम अतिशय उत्साहवर्धक आहेत. हा निकाल सामान्य लोकांच्या कल्याणासाठी, देशासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्साहवर्धक आहेत,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

"मी विरोधकांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी संसदेत निवडणुकीतील पराभवाचा राग काढू नका. मी सर्व खासदारांना शक्य तितक्या तयारीला येण्याची विनंती करतो. चांगल्या सूचना याव्यात आणि त्यानुसार काम व्हायला हवे. खासदार जेव्हा सूचना देतात तेव्हा त्यांना अनुभव असतो. पण चर्चा झाली नाही तर देश खूप चुकतो. सध्याच्या निवडणूक निकालांच्या आधारे विरोधी पक्षाच्या खासदारांसाठी ही शिकण्याची संधी आहे," असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.

"विरोधकांनी पराभवाचा राग काढण्यापेक्षा सकारात्मक चर्चा करायला हवी. गेल्या नऊ वर्षांपासून जे नकारात्मता पसरवत आहेत त्यांनी बदलायला हवं. निवडणुकीच्या पराभवाचा राग आतमध्ये काढू नका. विरोधाला विरोध करणं सोडून द्या. देश हितासाठी सकारात्मक गोष्टींची साथ द्या. तुम्ही विरोधात असलात तरी मी तुम्हा सल्ला देतो की, तुमचा राग आतमध्ये काढू नका. मी राजकीय दृष्टिकोनातूनही म्हणेन की तुमची प्रतिमा नकारात्मक होऊ नये हे तुमच्या हिताचे आहे. लोकशाहीत सत्ताधारी पक्षाइतकाच विरोधी पक्षही महत्त्वाचा आणि मौल्यवान असतो," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.