नवी दिल्ली : नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनात आलेली २००० रूपयांची नोट पुन्हा एकदा नागरिकांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावर केंद्राने तातडीने प्रतिक्रिया देऊन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
नोटबंदीचा निर्णय अचानक जाहीर करून केंद्र सरकारने अवघ्या देशाला चकीत करून टाकले. हा निर्णय घेताना १००० हजार रूपयांची नोट बंद करून त्या जागी २००० रूपयांची नोट लॉंच केली. ही नोट लॉंच होताच नागरिकांच्या आश्चर्याला पारावार राहिला नव्हता. हीच २००० ची नोट भविष्यात बंद करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याची चर्चा होती. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बुधवारी (२३ ऑगस्ट) ही शक्यता फेटाळून लावली. २००० रूपयांच्या चलनी नोटेबाबत बोलताना जेटली म्हणाले, '२००० रूपयांच्या नोटेवर बंदी घालण्याबाबत कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही. तसेच, नोटबंदीच्या निर्णय घेतल्यावर सरकारने विशेष तज्ज्ञांच्या सल्ल्याने ५०० आणि २००० रूपयांची नोट चलनात आणली होती.
दरम्यान, जेटली यांनी असेही सांगितले की, २०० रूपयांची नोट चलनात आणावी का, याबाबत रिझर्व्ह बॅंक लवकरच निर्णय घेईन. केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेला २०० रूपयांची नोट चलनात आणण्यास मंजूरी दिली आहे', असे सांगतानाच कमी किमतीच्या चलनी नोटांवर असलेला दबाव कमी करण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतल्याची सावध प्रतिक्रियाही जेटली यांनी दिली. पुढे बोलताना जेटली म्हणाले, 'नव्याने चलनात येणाऱ्या या नोटा कधी छापायच्या या बाबत रिझर्व्ह बॅंक निर्णय घेणार आहे.
दरम्यान, ७१व्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात नोटबंदीच्या निर्णयामुळे ३ लाख कोटी रूपये बॅंकींग प्रणालीत आल्याचे मोदींनी सांगितले. यात जमा करण्यात आलेली रक्कम १.७५ लाख कोटी घेवाणदेवाणीच्या स्वरूपात आहेत. तर, याशिवाय २ लाख कोटी रूपये इतका काळा पैसा बॅंकेत पोहोचला. मोदींनी या भाषणात सांगितले की, सरकारने ३ लाख शेल कंपन्यांना पकडले आहे. यातील सुमारे पावणेदोन लाख कंपन्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. मोदींनी सांगितले की, तुम्हाला कल्पना नसेन की, एकाच पत्त्यावर ४००-४०० कंपन्या चालत होत्या.