मनश्री पाठक, मुंबई : मुंबईच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सुप्त स्पर्धा सुरु झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईचा कारभारी आपल्याच पक्षाचा असावा असं शिवसेना आणि भाजपला वाटू लागलंय. विशेषत: येणा-या काळात मुंबई कुणाची? या प्रश्नापुढे आपलंच नाव लागावं याकरता भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. आणि याची सुरुवात मंत्रीपदांच्या वाटणीतूनच झाली आहे.
भाजपचे मंगल प्रभात लोढा आणि आशिष शेलार या भाजपच्याच दोन आमदारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडलीये. मंगल प्रभात लोढा हे सातव्यांदा मलबार हिलमधून, तर आशिष शेलार हे तिसऱ्यांदा वांद्रे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत. मुंबईमधील भाजपच्या दोन 2 दिग्गज नेत्यांचा मंत्रिमंडळातील समावेश म्हणजे या दोन्ही मंत्र्यांकडे मुंबई शहर आणि उपनगरचे पालकमंत्रीपद जाईल, अशी शक्यता आहे
गेल्या विधानसभेत मुंबई शहराचे पालकमंत्रीपद शिंदेसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे होते, तर उपनगरचे पालकमंत्रीपद भाजपचे मंगल प्रभात लोढा यांच्याकडे होते. मात्र यावेळी भाजपची विधानसभेतील ताकद आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मुंबई मिळवण्याची असलेली महत्त्वाकांक्षा पाहता, या दोन्ही जिल्ह्यांची पालकमंत्रीपदे मिळावीत, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. मुंबईवरील आपली पकड सैल होऊ नये, यासाठी शिंदेसेनेकडूनही पालकमंत्री पदासाठी निश्चित प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा : कोकणात राणेंना ताकद देऊन केसरकरांना डावललं? राजकीय कारकिर्दीचा उतरणीचा काळ?
2 मंत्रीमंडळात मुंबईचा चेहरा म्हणून शिंदेंच्या शिवसेनेच्या एकाही नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही. मात्र, किमान पालकमंत्रीपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेतला एखादा चेहरा देऊन भाजप-शिवसेनेचा पालकमंत्री मुंबईत ठेवावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय. 3 महायुतीतील मंत्रिपदनंतर आता पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू झालीय. त्यामुळे मुंबईचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार हेच आता पाहावं लागेल. गेल्या 2 दशकांपेक्षाही जास्त काळ शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर भगवा फडकावलाय. मात्र, आता महापालिका निवडणूका तोंडावर असताना मंत्रीपदांच्या वाटणीत मुंबईत शिंदेंच्या हाती भोपळा आला आहे. मुंबईतील भाजपच्याच दोन मंत्र्यांना पालकमंत्रीपद देणं हे तसं सहज शक्यही आहे. मात्र, मुंबई ताब्यात घेण्यासाठी आता शिवसेनाही जोर लावताना दिसतेय.