India vs Bharat : G-20 परिषदेच्या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Droupadi Murmu) यांनी येत्या 9 सप्टेंबरला आयोजित केलेल्या स्नेहभोजनाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या निमंत्रण पत्रिकेवर द प्रेसिडेंट ऑफ भारत (President of Bharat) असा उल्लेख असल्यानं देशातलं राजकारण तापलंय. काँग्रेस नेते जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी या नामांतराला जोरदार विरोध केलाय. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात देशातील तब्बल 28 राजकीय पक्षांनी मिळून इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स अर्थात इंडिया (INDIA) आघाडी स्थापन केलीय.. सध्या इंडिया आघाडीची जोरदार चर्चा असल्यानंच आता, इंडियाचं भारत असं नामांतर केलं जात असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतलाय.
सरकारच्या इंडिया नामांतराच्या अजेंड्याची सुरूवात पावसाळी अधिवेशनात सुरू झाल्याचं दिसतंय. संविधानात इंडियाऐवजी भारत असा बदल करावा, अशी मागणी भाजप खासदार नरेश बन्सल यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. मोदी सरकारच्या या हालचाली आता सुरू झाल्या असल्या तरी याला पार्श्वभूमी आहे ती सरसंघचालकांनी काही महिन्यांपूर्वीच केलेल्या विधानाची....आपला देश इंडिया नव्हे तर भारत आहे असा नारा मोहन भागवतांनी दिला होता.
पण आपल्या देशाला भारत हे नाव कसं पडलं, त्या इतिहासावर एक नजर टाकूया...
प्राचीन ग्रंथांमध्ये जम्बूद्वीप, भारतखंड, हिमवर्ष, आर्यावर्त अशा विविध नावांचा उल्लेख आहे. विष्णू पुराणानुसार, जेव्हा ऋषभदेवानं वानप्रस्थाश्रम स्वीकारला तेव्हा त्यांनी आपल्या भरत नावाच्या पुत्राला उत्तराधिकारी नेमलं. त्यावरून कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या देशाला भारतवर्ष असं नाव पडलं.तर आणखी एका पौराणिक मान्यतेनुसार, महाभारत काळात हस्तिनापूरचे महाराज दुष्यंत आणि शकुंतला यांच्या भरत नावाच्या पुत्रावरून देशाचं नाव भारत असं ठेवण्यात आलं. भरत हा चक्रवर्ती सम्राट होता, त्याच्यावरून आपल्या देशाला भारतवर्ष म्हटलं जातं
आता भारताला इंडिया हे नाव कसं पडलं, ते पाहूया...
ग्रीक भूगोलतज्ज्ञ मेगॅस्थेनिस यानं आपल्या भारतातील वास्तव्यावर इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला होता. इंग्रज आपल्या देशात आले तेव्हा त्यांनी सिंधू खोऱ्याचा उल्लेख इंडस व्हॅली असा केला. याच इंडस व्हॅलीवरून देशाचं इंडिया असं बारसं झालं
मात्र आता इंडियाऐवजी देशाचं पुन्हा एकदा भारत असं नाव बदलण्याच्या हालचाली केंद्र सरकारनं सुरू केल्यात. येत्या 18 सप्टेंबर रोजी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात इंडियाचं भारत असं नामांतर करण्यासाठी संविधानात सुधारणा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. नावात काय आहे, असं शेक्सपिअरनं म्हटलं होतं. मात्र नावात खुप काही आहे, हेच या भारत-इंडिया वादावरून स्पष्ट होतंय...