Holi 2023 : होळीच्या काळात अश्लील गाणी वाजवणाऱ्यांवर होणार कारवाई; पोलिसांनी जारी केले निर्देश

obscene songs ban on holi: पोलिसांनी यासंदर्भातील निर्देशच जारी केले असून कोणत्याही नागरिकाने तक्रार केल्यास तातडीने कारवाई केली जाईल असंही सांगितलं आहे.

Updated: Feb 18, 2023, 08:29 PM IST
Holi 2023 : होळीच्या काळात अश्लील गाणी वाजवणाऱ्यांवर होणार कारवाई; पोलिसांनी जारी केले निर्देश title=
loudspeaker on holi

Holi Obscene Songs Ban: होळीच्या (Holi 2023) सणानिमित्त अनेक ठिकाणी लाउड स्पीकरवर मोठ्या आवाजामध्ये गाणी लावली जातात. मोठ्या मोठ्याने गाणी वाजवून आनंद साजरा करत एकमेकांना रंग लावले जातात. अनेक ठिकाणी तर होळीच्या दिवशी अश्लील गाणीही (Obscene Song) वाजवली जातात. मात्र यंदा अश्लील गाण्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. महाशिवरात्रीपासून होळीपर्यंत लाउड स्पीकरवरुन अश्लील गाणी वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बिहार पोलिसांनी हा आदेश संपूर्ण राज्यात लागू केला आहे. पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात...

कारवाई करणार...

बिहार पोलिसांनी शनिवारी महाशिवरात्री आणि त्यानंतर तीन आठवड्यांनी होणाऱ्या होळी उत्सवापर्यंतच्या कालावधीसाठी इशारा जारी केला आहे. या कालावधीत लाउड स्पीकरवरुन अश्लील गाणी वाजवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. अपर पोलीस महानिर्देशक (मुख्यालय) जे. एस. गंगवार यांनी, जी गाणी ऐकायला शालीन (सभ्य) वाटत नाहीत अशा गाण्यांना अश्लील समजून त्यानुसार कारवाई करण्यात येईल असं म्हटलं आहे.

भावना दुखावणारी गाणी वाजवू नका

"पोलीस कर्मचारी या कालावधीमध्ये आपआपल्या नियुक्त परिसरामध्ये गस्त घालतील. लोकांनी अशी गाणी वाजवू नयेत जी अश्लील असतील आणि त्यामुळे एखाद्याच्या भवना दुखावू शकतील," असं गंगवार यांनी पत्रकारांना सांगितलं. विशेष म्हणजे नुकतेच विशेष शाखेद्वारे सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवण्यात आलं होतं. ज्यामध्ये जातीवाचक आणि सांप्रदायिक शब्द असलेली गाणी वाजवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

तक्रार करण्याचं आवाहन

या पत्रामध्ये उत्तर प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या सीवान आणि भोजपूरसारख्या जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारच्या गाण्यांवर खास करुन लक्ष ठेवण्याची गरज आहे. अशा गाण्यांमुळे अनेकदा सामाजिक तणाव निर्माण होतो. तसेच राज्यात बोलली जाणारी दुसरी सर्वात लोकप्रिय भाषा म्हणजेच भोजपुरीमधील दोन अर्थांची गाणीही अनेकांना खटकतात. "वादग्रस्त गाण्यांसंदर्भातील नियमांचं उल्लंघन झालं असलं वाटत असेल तर नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क करावा. खास करुन महाशिवरात्री आणि होळीच्या कालावधीदरम्यान अशा तक्रारींची तातडीने आणि अधिक प्रभावीपणे दखल घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत," असंही गंगवार यांनी सांगितलं.