Odisha Accident Viral video: सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही व्हिडीओ इतके भयानक असतात की ते पाहतानाही अंगावर काटा येतो. रस्ता ओलांडताना किंवा गाड्यांवरील नियंत्रण सुटल्यावर अनेकदा होणाऱ्या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर सर्रास अपलोड केले जातात. असाच एक अंगावर शहारे आणणार व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये भरधाव वेगाने धावणारी कार एका स्कुटरला धडकली आहे. इतकेच नव्हे तर या कारने स्कुटरसह दुचाकीस्वारालाही एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेलं ओडिशातील भुवनेश्वरमध्ये दुचाकी आणि कारचा हा भीषण अपघात झाला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या एक मिनिटांच्या व्हिडिओत भरधाव वेगानं जात असलेल्या या कार आणि दुचाकीचा अपघात पाहून तुम्हालासुद्धा धडकी भरेल,
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत अपघाताचे संपूर्ण चित्रण कैद झाले आहे. तेथेच उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात हा व्हिडिओ शूट केला आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील आहे. मात्र कुठे घडला याचे लोकेशन मात्र अद्याप कळलेले नाहीये. ही संपुर्ण घटना 31 जानेवारी म्हणजेच बुधवारी रात्री घडली आहे. या व्हिडीओमध्ये दिसून येतयं की, एक भरधाव वेगानं काळ्या रंगाची कार येत असून कारचालक सुसाट येऊन एका स्कुटरला धडकला आहे.
चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळं तो थेट स्कुटरला घेऊन जवळपास एक किलोमीटरपर्यंत गेला आहे. इतकचं नाही तर कारचा वेग इतका होता की कारच्या चाकांमधून चक्क आगीच्या ठिणग्या निघाल्याचेही दिसत आहे. कारचालकाच्या या चुकीमुळे या अपघातात एक महिला कारखाली चिरडली गेली आहे. तसचं, या अपघातात एक व्यक्तीही जखमी झाला आहे. या जखमी महिलेवर आणि या व्यक्तीवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चालक हा नशेच्या धुंदीत गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा गर्दी असल्याचेही दिसून येत आहे. सुदैवाने या अपघातात इतर कोण्याही व्यक्तीला गंभीर इजा झालेली नाही.
घटनास्थळाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी कारचालकावर जवळील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी करत चालकाला ताब्यात घेतलं असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. त्यानंतरच यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.