Odisha Train Accident: ओडिशामधील (Odisha) बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण ट्रेन अपघातामध्ये 275 जणांनी प्राण गमावला आहे. या भीषण अपघातात अपघातग्रस्त कोरामंडल एक्सप्रेसच्या (Coromandel Express) डब्ब्यांना यशवंतपुर एक्सप्रेसने (Bengaluru-Howrah Superfast Express) धडक दिली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. 51 तासांनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. मात्र या भीषण अपघातामधून काही जण अगदी चमत्कारिकरित्या बचावल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. असाच एक अंगाचा थरकाप उडवणारी 10 वर्षांच्या मुलाच्या संघर्षाची कहाणी समोर आली आहे.
बालासोरमधील भोगरईमधील रहीवाशी असलेला दहा वर्षांचा देबाशीष पात्रा हा मुलगा शुक्रवारी कोरोमंडल एक्सप्रेसने आपल्या कुटुंबियांबरोबर भद्रकला जात होता. बहनागा बाजार रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातानंतर देबाशीष 7 मृतदेहांखाली अडकला होता. पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या या मुलाच्या चेहऱ्यावर आणि कपाळावर अनेक जखमा झाल्या होता. हा मुलगा अनेक तास या अवस्थेत अडकून होता. अखेर या मुलाच्या मोठ्या भावाने स्थानिकांच्या मदतीने देबाशीषला वाचवलं. सध्या देबाशीषवर एससीबी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
देबाशीषने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेमकं काय काय घडलं याबद्दलची माहिती दिली आहे. "भद्रकला जाण्यासाठी आम्ही कोरोमंडल एक्सप्रेसची तिकीटं बुक केली होती. भद्रकमध्ये माझे काका-काकू आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी स्टेशनवर येणार होते. तिथून आम्ही सहकुटुंब पुरीला जाणार होतो. मी माझ्या आई-वडील आणि मोठ्या भावाबरोबर प्रवास करत होतो. बालासोरमधून ट्रेन पुढे रवाना झाल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज झाला. हा आवाज झाला तेव्हा मी माझ्या आईच्या बाजूला बसलो होतो. मोठा आवाज झाल्यानंतर आमचा डब्बा जोरात हलला आणि काही क्षणांमध्ये डोळ्यासमोर अंधार झाला. माझी शुद्ध हरपली होती. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला प्रचंड वेदना होत होत्या. मी मृतदेहांखाली अडकलो होतो हे मला जाणवलं," असं अपघाताबद्दल बोलताना देबाशीषने सांगितलं.
10 व्या इयत्तेमध्ये शिकणारा देबाशीषचा भाऊ शुभाषीश अंधारामध्ये आपल्या भावाला शोधत होता. अनेक तास शोध घेतल्यानंतर अखेर शुभाषीशला देबाशीष सापडला. शुभाषीशने स्थानिकांच्या मदतीने आपल्या भावाला अपघातग्रस्त ट्रेनच्या डब्यातून बाहेर काढलं. देवाशीषला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शुभाषीशने संयम दाखवून छोट्या भावाला वाचवल्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या 275 मृतांपैकी 150 हून अधिक मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या मृतदेहांचे फोटो सरकारने जारी केले असून मृतांच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यासंदर्भातील आवाहन करण्यात आलं आहे.