Odisha Train Accident : ओडिशातल्या (Odisha) बालासोरमध्ये गेल्या आठवड्यात संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघात आत्तापर्यंत 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 1,000 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. तीन रेल्वेगाड्यांमध्ये झालेल्या या भीषण अपघातानंतर मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या दुर्घटनेचा तपास पूर्ण झाला असून त्यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी (ashwini vaishnaw) सांगितले आहे. मात्र या अपघातात रेल्वेचे लोको पायलट आणि गार्डचे नेमकं काय झालं असे विचारलं जात आहे.
अपघातग्रस्त रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी ओडिशातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात इंजिन चालक आणि मालगाडीचा गार्ड थोडक्यात बचावला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसचे लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट आणि गार्ड यांच्यासह बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसचा चालक आणि गार्ड जखमींच्या यादीत होते, असे दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक राजेश कुमार यांनी सांगितले. सर्व जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोमंडल एक्स्प्रेस चालवणारे 36 वर्षीय सहाय्यक लोको पायलट हजारी बेहेरा 2 जून रोजीच्या अपघातानंतर मृत्यूच्या जबड्यातून बचावले आहे. सध्या भुवनेश्वरमधील खाजगीरित्या चालवल्या जाणार्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर त्यांचे सहकारी, कोरोमंडल एक्सप्रेसचे लोको पायलट जी.एन. मोहंती यांची प्रकृती गंभीर असून ते त्याच रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आहेत.
काहींनी या दुर्घटनेसाठी लोको पायलट आणि त्याच्या सहाय्यकाला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, "लोको पायलटचे काम ट्रेन सुरू करणे, थांबवणे आणि वेग वाढवणे हे असते. ताशी 128 किलोमीटरच्या वेगाने, तेही रात्रीच्या वेळी, लोको पायलटला मुख्य मार्गावर जाण्यासाठी जेव्हा त्याला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर गाडी मालगाडीला धडकणार आहे हे लक्षात आले नसेल. लोको पायलटचे यावर कोणतेही नियंत्रण नसते."
ओडिशा रेल्वे दुर्घटनेनंतर सुमारे 60 तासांनी पुन्हा या मार्गावरील गाड्यांची वाहतूक सुरू झाली आहे. रविवारी रात्री 10.40 च्या सुमारास शेकडो माध्यमे आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पहिल्या मालवाहू गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. कोळसा वाहून नेणारी ट्रेन विझाग बंदरातून राउरकेला स्टील प्लांटसाठी निघाली आणि बंगळुरू-हावडा ट्रेन ज्या रुळावरून घसरली त्याच रुळावरून धावली.
अपघात कसा झाला?
रेल्वेकडून सांगण्यात आले की ट्रेन क्रमांक 12481 कोरोमंडल एक्सप्रेस बहंगा बाजार स्टेशनच्या मुख्य मार्गावरून जात होती, त्याचवेळी ती रुळावरून घसरली आणि अप लूप मार्गावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ट्रेन पूर्ण वेगाने धावत होती, त्यामुळे 21 डबे रुळावरून घसरले आणि 3 डबे रुळावरून खाली गेले. त्याचवेळी डाऊन लाईवरुन जाणारी यशवंतपूर हावडा एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे धडकले.
प्रत्येक रेल्वे स्टेशनला दुसरी ट्रेन पास करण्यासाठी लूप लाइन असते. बहनगा बाजार स्टेशनवर अप आणि डाऊन अशा दोन लूप लाइन आहेत. स्टेशनवरून दुसरी ट्रेन पास करावी लागते तेव्हा कोणतीही ट्रेन लूप लाइनवर उभी केली जाते. बहनगा बाजार स्थानकावर या गाड्यांना थांबा नाही. अशा स्थितीत दोन्ही गाड्यांचा वेग जास्त होता. बहनगा बाजार स्थानकावरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरल्याने मालगाडीचे काही डबे मालगाडीला धडकले. दरम्यान, अपघाताच्या वेळी डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसचे मागचे दोन डबेही रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या कचाट्यात आले.