Manipur Statehood Day 2024 : गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात ईशान्येकडील राज्यात उसळलेल्या जातीय हिंसाचारात 180 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि हजारो लोक बेघर झाले. भारतीय सैन्यालाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या स्थापना दिवसानिमित्त खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे. मणिपूरच्या निरंतर विकासासाठी मी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा ही स्वतंत्र राज्ये होऊन पाच दशके झाली आहेत. मणिपूर, मेघालय आणि त्रिपुराला 21 जानेवारी 1972 रोजी ईशान्य क्षेत्र (पुनर्गठन) कायदा 1971 अंतर्गत स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही राज्यांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
मणिपूर राज्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. "राज्यातील लोकांना माझ्या शुभेच्छा. मणिपूरने भारताच्या प्रगतीत भरीव योगदान दिले आहे. आम्हाला राज्याच्या संस्कृतीचा आणि परंपरांचा अभिमान आहे. मी मणिपूरच्या निरंतर विकासासाठी प्रार्थना करतो," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
On Manipur’s Statehood Day, my best wishes to the people of the state. Manipur has made a strong contribution to India’s progress. We take pride in the culture and traditions of the state. I pray for the continued development of Manipur.
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2024
यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालय, त्रिपुराला देखील शुभेच्छा दिल्या आहेत. 'मेघालयातील लोकांना राज्याच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा! आज मेघालयची अविश्वसनीय संस्कृती आणि तिथल्या लोकांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करण्याचा एक प्रसंग आहे. मेघालय आगामी काळात प्रगतीची नवीन शिखरे पादाक्रांत करेल,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच अद्वितीय इतिहास आणि समृद्ध वारसा याबद्दल पंतप्रधानांनी आपला राज्यत्व दिन साजरा करणाऱ्या त्रिपुराचे कौतुक केले. 'त्रिपुराच्या जनतेला स्थापना दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. हा दिवस राज्याचा अनोखा इतिहास आणि समृद्ध वारसा साजरा करू दे. त्रिपुरातील जनतेला समृद्धी आणि सौहार्द लाभो,' असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
काँग्रेसची टीका
दरम्यान, आठवड्याभरापूर्वी मणिपूरमधून काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरु झाली आहे. यावरुन काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. अविश्वास प्रस्ताव आणण्याचे एकमेव कारण म्हणजे पंतप्रधानांनी मणिपूरबाबतचे मौन मोडावे. पंतप्रधान संसदेत 123 मिनिटे बोलले पण मणिपूरवर केवळ साडेतीन मिनिटे बोलले. गेल्या वर्षी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत विरोधी खासदारांनी सभात्याग केल्यानंतर आवाजी मतदानाने पराभूत झाला होता. पंतप्रधानांनी मणिपूरला भेट द्यावी, असे कॉंग्रेसने म्हटलं आहे.