'पंतप्रधानांचा कोरा कागद अर्थमंत्री कसा भरतात याचीच वाट पाहतोय'

यावर आमचं लक्ष असेलच...

Updated: May 13, 2020, 02:29 PM IST
'पंतप्रधानांचा कोरा कागद अर्थमंत्री कसा भरतात याचीच वाट पाहतोय' title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राष्ट्राला संबोधित करत जवळपास २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची मोठी घोषणा केली. ज्यानंतर विरोधी पक्षांनी मोदींच्या या घोषणेवर आपली परखड मतं मांडण्यास सुरुवात केली. 

देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी हे कोट्यवधींचं पॅकेज म्हणजे एका मथळ्याखाली असणारा कोरा कागद आहे, अशी प्रतिक्रिया दिली. जवळपास महिन्याभरापूर्वी जाहीर केलेल्या आर्थिक तरतुदींशिवाय आणखी वाढीव तरतुदींची घोषणा पंतप्रधानांनी केली. समाजातील विविध घटकांसाठी एकूण २० लाख कोटीरुपयांची आर्थिक व्यवस्था करत त्याच्या विभागणीचे निकष सांगितले. याच तरतुदीविषयी अर्थमंत्री निर्मला सीतारमण बुधवारी सविस्तर माहिती देत या पॅकेजची तीन टप्प्यांमध्ये घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली. 

वाचा : पंतप्रधानांच्या 'पॅकेज'ची अर्थमंत्री करणार ३ टप्प्यात घोषणा, या घटकांना दिलासा

देशापुढे असणारं कोरोना व्हायरसचं संकट आणि त्यावर पंतप्रधानांनी केलेली ही घोषणा पाहता चिदंबरम यांनी त्यांची बोचरी भूमिका स्पष्ट केली. 'कालच्या दिवशी पंतप्रधानांनी आपल्याला मथळा आणि कोरा कागद दिला. सहाजिकच माझी यावर काही प्रतिक्रियाच नव्हती. 

आज आपण, अर्थमंत्री हा कोरा कागद कसा भरणार हे पाहणार आहोत. आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेत जास्तीचा एक एक रुपया कशा प्रकारे टाकला जाणार आहे याची काटोकोर मोजणी करणार आहोत', असं ट्विट त्यांनी केली. 

 केंद्राच्या या आर्थिक घोषणा पाहता, गरीब, भूकेलेले, स्थलांतरित मजूर आणि , हजारो मैलांची पायपीट करणाऱ्यांच्या वाट्याला यातून नेमकं काय जातं याचा आपण हिशोब ठेवणार असल्याचा इशाराच चिदंकबरम यांनी दिला. कोणाला काय मिळणार यावर आमचं लक्ष असेल, या भूमिकेवर ते ठाम असल्याचच स्पष्ट होत आहे.