आजकाल मुलांची नवनवीन नावं ऐकायला मिळतात. मुलांची नावं ठेवणं हेही मोठं काम झालं आहे. मुलांची नावं ठेवण्यासाठी पालक खूप धडपडतात, पण नावं ठेवण्याबाबत जोडपं एकमेकांशी सहमत नसतात तेव्हा अडचण निर्माण होते. कर्नाटकातून असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे मुलाच्या नावासाठी एकमत न झाल्यामुळे पती-पत्नी चक्क कोर्टात पोहोचले आहे.
कर्नाटकात पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला, जेव्हा 26 वर्षीय पुरुषाने स्वतःच्या मुलाच्या नामकरण समारंभाला हजेरी लावली नाही. या कपलच्या मुलाचा जन्म 2021 मध्ये झाला. त्यांच्या 21 वर्षीय पत्नीने मुलाच्या नामकरण समारंभाचे आयोजन केले होते. पत्नीने मुलाचे नाव 'आदि' ठेवण्याचा सल्ला दिला होता, जो पतीला मान्य नव्हता. त्यांनी मुलाचे नाव 'शनी'ठेवण्याचा सल्ला दिला होता.
(हे पण वाचा - श्रीगुरुदेव दत्तांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे; गुरुचरित्राचे होईल स्मरण)
अनेक महिन्यांच्या वादानंतर महिलेने न्यायालयात धाव घेतली. या महिलेने वेगळे राहण्याची आणि देखभाल करण्याची मागणी केली आहे. न्यायाधीशांनी दिलेल्या सूचनाही महिलेने फेटाळून लावल्या. मात्र, गेल्या आठवड्यातच म्हैसूर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मुलाला त्याच्या पालकांकडे बोलावून घेतले आणि तीन वर्षांच्या मुलाचे नाव "आर्यवर्धन" ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तीन वर्षानंतर आईने बाळाचा नामकरण सोहळा केला आहे.
मुलाच्या नावावरून वाद होण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी केरळ उच्च न्यायालयाने तीन वर्षांच्या मुलीचे नाव ठेवले होते कारण तिचे पालक वेगळे झाले होते आणि मुलीचे नाव काय ठेवावे यावर त्यांच्यात एकमत नव्हते. मुल ज्या आईसोबत राहत आहे त्या आईने सुचवलेल्या नावाला महत्त्व दिले जावे, वडिलांमध्ये कोणताही वाद नसताना वडिलांचे नावही समाविष्ट करावे, असे आदेशात न्यायालयाने म्हटले आहे.