Layoff News : कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये (Corporate Jobs) कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि त्याहूनही कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार या सर्वच गोष्टींचा अनेकांना हेवा वाटतो. पण, बऱ्याचदा हा हेवा पुरेसा नसतो. जागतिक आर्थिक मंदीमुळं जगभरातील कंपन्यानी संकटाची चाहूल लागताच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये सर्वाधिक फटका बसला तो म्हणजे कर्मचारी वर्गाला. जगभरातील आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसला. त्यातच आता आणखी 3500 कर्मचाऱ्यांचीही भर पडली आहे.
वन97 कम्युनिकेशंस अर्थात पेटीएमचे स्वामित्वं हक्क असणाऱ्या कंपनीकडून 3500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचं म्हटलं जात आहे. कंपनीकडूनच दावा करण्यात आल्यानुसार कंपनीकडूनच कर्मचाऱ्यांच्या आउटप्लेसमेंट अर्थात दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठीचा शोध घेण्यासंदर्भातील काळजी घेतली जात आहे. जानेवारी ते मार्च दरम्यानच्या तीन महिन्यांच्या कालावधीत या कंपनीच्या कर्मचारी संख्येत तीन हजारांहून मोठ्या फरकानं घट झाल्याचं निदर्शनास आलं होतं. (paytm Layoff)
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी नोकरी मिळवून देण्याच्या हेतुनं सध्या कंपनीच्याच HR विभागाकडून जवळपास, 30 हून अधिक संस्थांशी संपर्क साधला जात असून, येत्या काळात नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या संस्थांमध्ये नोकरीवर रुजू करण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं आहे.
ज्या कर्मचाऱ्यांची बोनसची रक्कम आणि तत्सम देय रक्कम बाकी आहे अशा कर्मचाऱ्यांना पूर्ण परतावा देण्यावर आपला भर असल्याचं पेटीएमकडून स्पष्ट करण्यता आलं आहे. काही दिवसांपूर्वीच व्यवसायाची पुनर्बांधणी करणार असल्याचं सांगत पेटीएमकडून येत्या काळात एआय तंत्रज्ञानाचा वापर करत त्याचा व्यवसायात व्यापक स्वरुपात समावेश करणार असल्याचेही संकेत कंपनीनं दिले होते. पण, सध्या मात्र कर्मचारी कपातीच्याच प्रश्नावरच कंपनी तोडगा सोधताना दिसत आहे.
2024 मधील जानेवारी ते मार्च या महिन्यांमध्ये पेटीएममधील कर्मचाऱ्यांची संख्या 3500 नं कमी होऊन आता 36,521 वर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पेटीएम पेमेंट्स, बँकिंग सेवांवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळं ही कर्मचारी कपात करण्यात आल्याचं म्हटलं गेलं. 15 मार्चपासूनच आरबीआयनं कोणताही ग्राहक, वॉलेट, फास्टॅग मध्ये जमा रकमेचा स्वीकार करण्यावर बंदी आणली होती.
(RBI) आरबीआयचा दणका, त्यानंतर झालेली कर्मचारी कपात या साऱ्याचा थेट परिणाम कंपनीच्या वार्षिक उत्पनातील खालावलेल्या आकड्यामध्येही दिसून आली. 2023-24 मध्ये फिनटेक कंपनी वन97 कम्युनिकेशंसचा तोटा चौथ्या तिमाहीत आणखी वाढून 550 कोटींवर आला. ज्यामुळं येत्या काळात कंपनीपुढं असणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होणार नाहीत, हेच चित्र आता स्पष्ट होत आहे.