Pension News : नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच महिन्याच्या वेतनासह आणखी एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन. सरकारी असो वा खासगी संस्थेसाठी काम करणारे कर्मचारी. या सर्वांनाच कायद्यानं निवृत्तीवेतनाची तरतूद करून दिली जाते. याच लाखे पेन्शनधारकांसाठी आता एक मोठी बातमी समोर आली असून, त्यांची एक महत्त्वाची मागणी मान्य केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पीएस-95 राष्ट्रीय आंदोलन समिती (NAC) मागील काही दिवसांपासून सातत्यानं पेन्शनवाढीची मागणी करत असून, सरकारही या मागणीचा सकारात्मक विचार करत असून, तसा विश्वास त्यांनी दिल्याचं समितीकडून सांगण्यात आलं आहे. या मागणीनुसार ईपीएस-95 योजनेअंतर्गत जवळपास 78 लाख पेन्शनधारकांना किमान मासिक पेन्शन स्वरुपात वाढ करून ही रक्कम 7500 रुपये करण्यात यावी अशी समितीची भूमिका आहे.
काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या एका बैठकीमध्ये पेन्शनधारकांच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत प्रतिनिधींची भेट झाली असून या भेटीमध्ये सदर मागणी पूर्ण करण्याचा विश्वास मंत्रीमहोदयांनी दिला.
समितीच्या माहितीनुसार जवळपास 36 लाख पेन्शनधारकांना प्रतिमहा 1000 रुपयांहूनही कमी रक्कम मिळत असून, या रकमेमुळं वयोवृद्ध दाम्पत्यांना आर्थिक गरजा भागवण्यास अनेक आव्हानं येतात ज्यामुळं पेन्शनची रक्कम वाढवून 7500 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांच्या जोडीदाराला मोफत आरोग्यसुविधांची तरतूद करून देण्याची मागणीसुद्धा करण्यात आली आहे.