पुन्हा पेट्रोल डिझेलची दरवाढ अटळ! कच्च्या तेलाचे भाव कडाडले, ब्रेंट क्रूडचा दर 124 डॉलरच्या वर

गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असणारे पेट्रोल डिझेलचे भाव पुन्हा एकदा कडाडड्याची भीती निर्माण झाली आहे. 

Updated: Jun 9, 2022, 08:41 AM IST
पुन्हा पेट्रोल डिझेलची दरवाढ अटळ! कच्च्या तेलाचे भाव कडाडले, ब्रेंट क्रूडचा दर 124 डॉलरच्या वर  title=

निनाद झारे,मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असणारे पेट्रोल डिझेलचे भाव पुन्हा एकदा कडाडड्याची भीती निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 8 मार्च 2008 म्हणजे जवळापास 14 वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ जाऊन पोहचले आहेत. सोबतच डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही विक्रमी घसरण सुरु आहे

त्यामुळे देशातर्गंत इंधनाचे दर पुन्हा एकदा कडाडण्याची भीती आहे. जवळपास दोन आठवड्यापूर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (excise duty) कमी केल्यानं पेट्रोल डिझेल काही प्रमाणात स्वस्त झालं होतं. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात  आजही पेट्रोलचा दर 111 रुपयांच्या आसपास तर 97 रुपयांच्या आसपास आहेत. आता कच्च्या तेलानं पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठल्यानं केंद्रानं दिलेला दिलासा अगदीच औट घटकेचा ठरतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

का वाढतायत कच्च्या तेलाचे दर?

जून महिन्याच्या सुरुवातीपासून चीनमध्ये कोरोनामुळे झालेलं लॉकडाऊन शिथील होऊ लागलं आहे. ही प्रक्रिया सावकाश होत असली, तरी पुढील महिन्याभरात चीनमधून येणारी कच्च्या तेलाची मागणी पुन्हा एकदा पूर्वपदावर येईल अशी चर्चा आंतरराष्ट्रीय तेल बाजारात सुरु आहे. त्यामुळेच कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडू लागले आहे. गेल्या गुरुवारी आणि शुक्रवारी ओपेक+(OPEC+) देशांच्या समूहानं कच्च्या तेलाचे उत्पादन जवळापास दररोज साडे सहा लाख बॅरलनी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर काहीसे खाली आले. पण दरांमध्ये आलेली ही घसरण तात्पुरतीच ठरताना दिसतेय. आज कच्च्या तेलानं पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली आहे,

रुपयाच्या घसरणीचा फटका

गेल्या काही दिवसांपासून जागतिक चलन बाजारात अमेरिकन डॉलरची किंमत सातत्यानं वाढतेय. त्याचा परिणाम भारतीय चलन बाजारातही बघयाला मिळतोय. बुधवारी भारतीय रुपयाची किंमत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर घसरली. एका डॉलरसाठी बुधवारी 77.73 रुपये मोजावे लागत होते. 

रुपयाची घसरण थांबवण्यासाठी काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक सातत्यानं  चलन बाजारात अघोषित हस्तक्षेप करत आहे. पण त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाहीय. एका बाजूने वाढणारे कच्च्या तेलाचे दर आणि दुसऱ्या बाजूने घसरणारा रुपया यामुळे देशातील ऑईल कंपन्यांना आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेला दुहेरी फटका बसतोय. 

महागाई विषयी रिझर्व्ह बँक काय म्हणते?

बुधवारी जाहीर झालेल्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षात पुढील किमान सहा महिने महागाईचा दर चढाच राहील असं भाकित वर्तवलंय. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे त्यामागचं प्रमुख कारण ठरताना दिसतंय. गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या पतधोरण आढाव्याच्या भाषणात महागाई आणि त्यावरील उपाय योजना यावर स्वतंत्र परीच्छेद समर्पित करण्यात आला.

रिझर्व्ह बँकेला देशातील महागाईचा दर वर्ष अखेरीला पाच ते साडे पाच टक्क्यांच्या दरम्यान आणायचा आहे. त्यासाठी बँक पुन्हा व्याजदरात वाढ करेल असे संकेतही गव्हर्नर दास यांनी दिले आहेत. पण मुळात महागाई वाढण्याचं कारण हे कच्च्या तेलाचे भाव आहे असं मानलं, तर केवळ व्याजदरातील वाढ ही महागाई कमी करण्यास पुरेशी ठरणार नाही हेही तितकेच स्पष्ट आहे.