Delhi दिल्लीहून गुवाहाटीकडे निघालेल्या गो फर्स्ट (Go First) कंपनीच्या विमानाची काच विमान उंचावर असताना तडकली. त्यामुळे विमानाचे जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करावे लागले. इमर्जन्सी लँडिंग यशस्वी झाल्यामुळे विमानातील प्रवाशांचे प्राण वाचले.
DGCAने दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळच्या सुमारास गो फर्स्टच्या A320neo या विमानाने दिल्लीतून उड्डाण केले. काही वेळातच काचेला तडा गेला आणि वैमानिकाने दिल्लीतील एअर ट्राफिक कंट्रोलशी (air traffic controller) संपर्क साधला. मात्र पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लँडिंग करणे शक्य नव्हते. अखेर काच फुटलेल्या अवस्थेतच विमान जयपूरकडे वळवण्यात आले आणि तिथे त्याचे यशस्वी लँडिंग केले गेले. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने गुवाहाटीला नेण्यात आले.
गो फर्स्टच्या प्रवक्त्याने ही घटना घडल्याचे मान्य केले. 'वैमानिक हा अत्यंत अनुभवी होता. त्यानं हा प्रसंग शांतपणे आणि परिपक्वपणे हाताळला' असं कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
दोन दिवसांत तिसरा बिघाड
गो फर्स्ट कंपनीच्या विमानांमध्ये बिघाड होण्याची दोन दिवसांमधील ही तिसरी घटना आहे. मंगळवारी गो फर्स्टच्या मुंबई-लेह आणि श्रीनगर-दिल्ली विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती DGCAच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दोन्ही विमानांना आता पूर्ण चाचण्या केल्यानंतरच उड्डाणाची परवानगी देण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
विमान प्रवास किती सुरक्षित ?
गेल्या चार दिवसांमध्ये देशाचे नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी विमान कंपन्या आणि अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत. DGCAला विमानांच्या सुरक्षेवर निगराणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यानंतर DGCAने केलेल्या स्पॉट चेकमध्ये काही कंपन्यांमध्ये विमानाच्या तपासणीसाठी अभियंत्यांची संख्या पुरेशी नसल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक उड्डाणापूर्वी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियरकडून विमानांची संपूर्ण तपासणी होणे आवश्यक असते. मात्र आता अभियंत्यांची संख्या अपुरी असल्याचे समोर आल्यामुळे देशात विमान प्रवास किती सुरक्षित आहे, असा प्रश्न निर्माण झालाय.