पंतप्रधान मोदी आज २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

देशातील एकूण परिस्थितीवर होणार चर्चा

Updated: Jun 16, 2020, 11:22 AM IST
पंतप्रधान मोदी आज २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा title=

नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूची अनियंत्रित गती, दररोज १० हजाराहून अधिक रुग्णांची वाढ आणि अनलॉक होण्याची प्रक्रिया या दरम्यान आज आणि उद्याचा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार आणि बुधवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी तीनपासून याला सुरुवात होईल. आज २१ राज्यांचे मुख्यमंत्री या चर्चेत सहभागी होतील. चर्चेच्या दोन फेऱ्या असणार आहेत.

आज पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, चंडीगड, गोवा, मणिपूर, नागालँड, लडाख, पुडुचेरी, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, अंदमान-निकोबार, दादर-नगर हवेली, दमण-दीव , सिक्किम आणि लक्षद्वीप या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होईल.

याशिवाय बुधवारी दुसर्‍या टप्प्यातील चर्चा होणार असून यात दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश यासारख्या बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असेल. देशातील एकूण कोरोना विषाणूपैकी सुमारे 70 टक्के रुग्ण या राज्यांमध्ये आहे. ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे.

लॉकडाऊननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी पाचव्यांदा चर्चा करणार आहेत. अनलॉक 1 ची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना अधिक अधिकार दिले होते.

आता देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत आणि अर्थव्यवस्था जवळजवळ ढासळली आहे. तेव्हा हे दुहेरी आव्हान कसे पेलायचे आणि रुग्णवाढ कशी रोखायची यावर चर्चा होऊ शकते.

गेल्या एका आठवड्यापासून देशात दररोज दहा हजार रुग्ण वाढत आहेत. दररोज १० ते ११ हजार रुग्णांची वाढ होत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या ३.३२ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. तर ९ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यूही झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सद्यस्थितीवर उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. ज्यामध्ये आपात्कालीन योजना तयार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.