भारत- चीन तणाव: पंतप्रधान मोदी- अजित डोवाल यांच्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा?

सैन्यदल प्रमुखांचीही यावेळी उपस्थिती होती. 

Updated: May 27, 2020, 08:49 AM IST
भारत- चीन तणाव: पंतप्रधान मोदी- अजित डोवाल यांच्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा?  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : India भारत आणि चीन China या दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमा प्रश्नावरुन उदभवलेली एकंदर परिस्थिती पाहता अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सैन्यदल प्रमुख बिपीन रावत यांची भेट घेत या मुद्दयांवर चर्चा केल्याची माहिती समोर आली. 

मागील दोन आठवड्यांपासून भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांच्या लष्करामध्ये आलेला तणाव पाहता आता परिस्थितीला गंभीर वळण मिळत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

अजित डोवाल, बिपीन रावत आणि पंतप्रधानांमध्ये झालेल्या या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याचं वृत्त 'द टेलिग्राफ'ने प्रसिद्ध केलं आहे. देशाच्या संरक्षणाला केंद्रस्थानी ठेवत घेण्यात आलेल्या या बैठकीमध्ये पूर्व लडाखच्या भागातील सीमा प्रश्नावर चर्चा झाली. ज्यामध्ये या भागाच्या संरक्षणासाठी केंद्राकडून कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नसल्याचं सांगण्यात आलं. या धर्तीवर अनेक चर्चा आणि बैठका सुरु आहेत. कारण दोन्ही राष्ट्रांच्या LAC लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलविषयीच्या भूमिका वेगळ्या असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. 

युद्धासाठी सज्ज व्हा! चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा सैन्याला इशारा

मागील काही दिवसांपासून चीनकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण हालचाली पाहता, मंगळवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्धा लष्कर प्रमुख बिपीन रावत आणि तिन्ही संरक्षण दलांचे म्हणजेच वायुदल, भूदल आणि नौदलाच्या प्रमुखांशी या विषयावर चर्चा केली होती. भारत आणि चीन या दोन्ही सैन्यांकडून सीमा भागात वाढवण्यात येणाऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा यावेळी अधोरेखित करण्यात आला. 

 

मुळ सीमेवरील चित्राविषयी सांगावं तर, काही अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार चीन आणि भारताच्या जवळपास तीन चौक्या या एकमेकांपासून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. तर, तेथे तैनात असणाऱ्या जवानांमध्येही फार अंतर नाही. तेव्हा आता शांततेच्या मार्गाने हा प्रश्न निकाली काढण्यात सैन्य यशस्वी होणार की, येत्या काळात सीमेवरील घडामोडी अशाच सुरु राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.