PM SVANidhi Yojana News: कर्ज... हल्ली अनेकांच्याच जीवनातील एक महत्त्वाचा घटक ठरत आहे. एखादी वस्तू खरेदी करण्यापासून एखाद्या नव्या व्यवसायाच्या सुरुवातीपर्यंत प्रत्येक वेळी हे कर्ज बरीच मदत करून जातं. सहसा कर्ज घेतल्यानंतर व्यक्तीला एकिकडून दिलासा मिळत असला तरीही दुसरीकडून मात्र कर्ज फेडण्यासाठीचं दडपण असतं. आता मात्र ही चिंता काहीशी मिटणार आहे. अर्थात कर्ज फेडावं लागणार आहेच, पण ते मिळवणं सोपं होणार आहे. निमित्त ठरतेय ते म्हणजे केंद्र शासनाची एक योजना.
एखादा नवा व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायासाठी तुम्हाला वर्किंग कॅपिटल म्हणून तातडीनं रोकड आवश्यक असल्यास किंवा पैशांची गरज भासल्यास अशा परिस्थितीत गॅरन्टी देण्यासाठी काहीही नसेल तरीही आता चिंता करण्याची गरज नाही. भारत सरकारच्या एका योजनेअंतर्गत तुम्हाला कोणतीही गोष्ट तारण ठेवणं गरजेचं नसून, फक्त आधार कार्ड दाखवूनच तुम्हाला हे कर्ज सहजगत्या दिलं जाणार आहे.
तीन हफ्त्यांमध्ये गरजूंना हे 80 हजार रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार असून, ते फेडण्यासाठीसुद्धा कमीत कमी व्याजदर असणारे हफ्ते निश्चित करण्यात आले आहेत. सरकारची पंतप्रधन स्वनिधी योजना लघुउद्योग सुरू करणाऱ्यांसाठी कर्ज बरीच मदत करणार असून, वर्किंग कॅपिटल फ्लोमध्ये सातत्य राखण्यासाठी म्हणून या कर्जाची आखणी करण्यात आली आहे.
ऑनलाईन पद्धतीनं कर्ज घेतल्यास तुम्हाला वर्किंग कॅपिटल म्हणून 10 हजार रुपये दिले जातील. ही रक्कम फेडल्यानंतर लगेचच तुम्हाला कर्जाचा दुसरा हफ्ता म्हणजेच 20 हजार रुपये दिले जातील. हे पैसे फेडल्यानंतर कर्जाचा तिसरा हफ्ता म्हणजे 30 हजार रुपये तुमच्या हाती येतील आणि ही रक्कम फेडल्यानंतर कर्जाचा शेवटचा हफ्ता तुम्हाला मिळेल. त्याची रक्कम असेल 50 हजार रुपये.
पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत सात टक्क्यांच्या दरानं अनुदानही दिलं जात असून, याशिवाय डिजिटल देवाणघेवाणीला वाव देण्यासाठी वर्षाला 1200 रुपयांचा कॅशबॅकही दिला जातो.