क्या बात! अनेकांचं खातं असणाऱ्या बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ; आता मॅच्युरिटीवेळी मिळणार जास्त रक्कम

National Bank FD Rates: तुम्हीही बँकेत एफडी सुरु केली आहे का? सातत्यानं बदलणाऱ्या नियमांवर नजर टाका, पाहा नेमके काय बदल झाले आहेत...

सायली पाटील | Updated: Jan 4, 2024, 03:10 PM IST
क्या बात! अनेकांचं खातं असणाऱ्या बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ; आता मॅच्युरिटीवेळी मिळणार जास्त रक्कम title=
PNB FD Rates in comparision with sbi hdfc and other banks

National Bank FD Rates: बँकेकडून सातत्यानं खातेधारकांना केंद्रस्थानी ठेवत आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन करत काही सुविधांची आखणी केली जाते. खातेधारकांना या नियमांचा थेट स्वरुपात फायदा मिळतो. बँकांकडून देण्यात येणाऱ्या अशाच सुविधांमध्ये समावेश असतो तो म्हणजे एफडी खात्यांवर देण्यात येणाऱ्या व्याजदरांचा. अशाच एका मोठ्या बँकेनं एफडीवरील व्याजदरांमध्ये वाढ करत खातेधारकांना नव्या वर्षाची भेट दिली आहे. 

एफडीवरील व्याजदर वाढवणारी ही बँक आहे, पंजाब नॅशनल बँक (PNB). 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर बँकेकडून व्याजदरात लाढ करण्यात आली असून काही निर्धारित कालावधीसाठीच्या ठेवींवर 50 (bps) ची वाढ केली आहे. 1 जानेवारी 2024 पासून हे नवे दर लागू झाले आहेत. 

पीएनबीकडून 180 ते 270 दिवसांच्या अवधीवरील व्याजरामध्ये 50 बीपीएस इतकी वाढ केली आहे. या ठेवींवर खातेधारकांना 6 टक्क्यांनी व्याज मिळेल. तर, 271 ते 1 वर्षापर्यंतच्या एफडीवर 45 बीपीएसची वाढ केली आहे, जिथं 7.25 टक्के व्याज मिळेल. 400 दिवसांसाठीच्या मॅच्युरिटी असणाऱ्या ठेवीवर बँक 6.80 ते 7.25 टक्के व्याज देत आहे. 

नव्यानं करण्यात आलेल्या बदलांनुसार 7 दिवसांपासून 1 वर्षापर्यंत मॅच्युर होणाऱ्या एफडीवर 4 ते 7.75 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत असून, सुपर सिनिअर्सना 4.3 ते 8.5 टक्क्यांपर्यंतचं व्याज मिळतं. दरम्यान, बँकेनं 444 दिवसांच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये 45 बीपीएसची कपात केली आहे. यामुळं आता हे दर 7.25 वरून थेट 6.8 टक्क्यांवर पोहोचले आहेत. 

हेसुद्धा वाचा : शिवडी- न्हावाशेवा सी लिंकवरील प्रवासासाठी किती टोल द्यावा लागणार? शिंदे सरकारकडून रक्कम जाहीर 

इथं पीएनबीच्या व्याजदरांमध्ये बदल झालेले असतानाच इतरही बँकांच्या व्याजदरात बदल दिसून आले. यामध्ये एसबीआय आणि बँक ऑफ बडोदाचाही समावेश आहे. एसबीआयकडून 27 डिसेंबर 2023 रोजी लागू करण्यात आलेल्या नव्या बदलांनुसार 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या मॅच्युरिटी असणाऱ्या एफडीवर 3.5 ते 7 टक्के व्याज देण्यात येत आहे. तर, बँक ऑफ बडोदामध्ये ही रक्कम 4.75 ते 7.75 टक्के इतकी आहे.