Mumbai Trans Harbour Link : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात शिवडी- न्हावाशेवा सागरी सेतूसाठी नेमका किती टोल असणार याबाबतचे अनेक तर्क गेल्या काही दिवसांपासून लावण्यात आले होते. आता मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय झाला असून शिंदे सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतर ही रक्कम जाहीर करण्यात आली आहे. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरून प्रवास करण्यासाठी 250 रुपये टोल
असेल असं या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं.
21.08 किलोमीटर लांबीच्या न्हावा शेवा सागरी सेतूचा लोकार्पण सोहळा 12 जानेवारी 2024 रोजी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या सागरी सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असण्याची चिन्हं असून, त्यांना यासाठीची विनंतीसुद्धा करण्यात आली आहे. पण, पंतप्रधान कार्यालयाकडून मात्र यासंदर्भातील माहितीला दुजोरा देण्यात आलेला नाही.
न्हावा-शेवा सागरी सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल असून, त्यामुळं मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर अवघ्या 30 मिनिटांमध्ये ओलांडता येणार आहे. हा सागरी सेतू फक्त मुंबई आणि नवी मुंबईला जोडणार नसून, तो निर्माणाधीन नवी मुंबई विमानतळ, जेएनपीए बंदर, मुंबई गोवा महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग या महत्त्वाच्या मार्गांशी जोडला जाणार आहे. परिणामी इंधन आणि वेळेची सहज बचत करता येणार आहे.