दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठा बंदोबस्त, उत्तर प्रदेश हाय अलर्टवर

शेतकर्‍यांनी आज ‘भारत बंद’ पुकारला आहे.

Updated: Dec 8, 2020, 08:57 AM IST
दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठा बंदोबस्त, उत्तर प्रदेश हाय अलर्टवर title=

नवी दिल्ली : दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर बॉर्डरवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भाजीपाला आणि दूधाची आवक जावक सुरूच आहे. सकाळच्या सुमारास भारत बंदचा परिणाम दिसून येत नाहीये. गेल्या 12 दिवसांपासून दिल्ली सीमेवरील नवीन कृषी कायद्याचा निषेध नोंदविणार्‍या शेतकर्‍यांनी आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत, परंतु अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. 

शासनाने प्रस्तावित केलेल्या कृषी कायद्यांमधील दुरुस्तीबाबत ते समाधानी नसल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. उद्या (बुधवार) पुन्हा दोघांमध्ये बैठक होणार आहे.

भारत बंदच्या पार्श्वभुमीवर उत्तर प्रदेश हाय अलर्टवर आहे. उत्तर भारतातील काही भागांमध्ये आणि काही बिगर भाजप शासित राज्यांमध्ये बंदला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. जवळपास सर्व विरोधी पक्ष आणि अनेक कामगार संघटनांनी 'भारत बंद' आणि शेतकर्‍यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सुरक्षा अधिक कडक करण्यास व कोरोना व्हायरस (कोविड -१)) संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी एक पत्रक जारी केलं आहे.

'भारत बंद'मुळे सामान्य जनतेची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पुरेशी व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकर्‍यांशी कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये असा सल्ला त्यांनी पोलिसांना दिला आहे. दिल्ली व इतर राज्यांलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता घेतली जात आहे आणि तेथे अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.