नीरज गौड, झी मीडिया, नवी दिल्ली : दिल्लीच्या शाहीन बागमध्ये शनिवारी तरुणानं केलेल्या फायरिंगवरुन आता राजकीय चकमक सुरू झाली आहे. अरविंद केजरीवाल, ओवेसी यांनी यानिमित्तानं भाजपवर निशाणा साधला आहे. पण मुळात तरुणानं हा गोळीबार का केला अशी चर्चा सुरु आहे. कपिल गुर्जर या २५ वर्षाच्या तरुणाला यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दिल्लीच्या दल्लुपुरामध्ये राहणारा हा तरुण आहे.
शनिवारी संध्याकाळी त्यानं शाहीन बाग परिसरात देशी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळं एकच खळबळ उडाली. सीएएला विरोध करणाऱ्या शाहीन बाग आंदोलकांनी गेल्या दीड महिन्यांपासून रस्ता अडवून धरला आहे. त्यामुळंच कपिलनं हे अतिरेकी पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं आहे. तो अचानक आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचला आणि त्यानं हवेत गोळीबार केला.
गोळीबाराचा आवाज ऐकून आंदोलकांमध्येही घबराट पसरली. ते रस्त्यावरून खाली धावू लागले. पोलिसांनी पकडल्यानंतर कपिलनं त्याच्या डोक्यात काय चाललंय, हे ओरडून सांगितलं.
देशी कट्ट्यातून दोन राऊंड फायर करणाऱ्या कपिलविरुद्ध आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल झालाय. कोणत्याही संघटनेशी त्याचा संबंध नाहीय. नोयडाच्या खासगी कॉलेजात तो मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतो आहे. कपिलनं एवढं अतिरेकी पाऊल का उचललं, याबाबत कुटुंबीय देखील संभ्रमात आहेत.
या घटनेमुळं शाहीन बागमधील आंदोलक नाराज झाले आहेत. शिवाय त्यावरून राजकीय टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी याचं खापर भाजपवर फोडलंय. तर अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना लक्ष्य केलंय. दिल्लीत दिवसाढवळ्या गोळीबार होतो. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघतायत, असा टोला त्यांनी लगावला.
शाहीन बाग आंदोलकांनी रस्ता बंद केल्यानं दिल्ली आणि नोएडातील अनेक लोकांना त्रास सहन करावा लागतोय. हायकोर्टानं देखील रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेत. पण शाहीन बाग आंदोलक अडून बसलेत. हा तिढा कधी सुटणार आणि हे प्रकरण काय वळण घेणार, याकडं आता लक्ष लागलंय..