गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट

हत्तीणीच्या निर्घुण हत्येनंतर मोठा संताप व्यक्त होत आहे.

Updated: Jun 3, 2020, 08:27 PM IST
गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट title=

नवी दिल्ली : केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला अतिशय क्रूरपणे मारल्याची घटना समोर आली. हत्तीणीच्या अशाप्रकारे केलेल्या निर्घुण हत्येनंतर सर्वच स्तरातून मोठा संताप व्यक्त होत आहे. एका मुक्या प्राण्याची निष्ठुरपणे हत्या केल्यानंतर बॉलिवूडपासून ते राजकीय नेत्यापर्यंत सर्वांकडूनच तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. भाजप खासदार आणि पशु अधिकार कार्यकर्त्या मनेका गांधी यांनीदेखील हत्तीणीच्या हत्येबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

एका प्राण्याचा हा खून आहे. मलप्पुरम अशा घटनांसाठी प्रसिद्ध आहे. हा भारतातील सर्वात हिंसक जिल्हा आहे. ते रस्त्यावर विष टाकतात जेणेकरुन एकाच वेळी 300 ते 400 पक्षी आणि कुत्री मरतात, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त करत हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

इतकंच नाही तर मनेका गांधी यांनी काँगेस खासदार राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. राहुल गांधी या भागातील आहेत, त्यांनी कारवाई का केली नाही? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. एकाही वन्य प्राणी शिकाऱ्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे ते अशी कृत्ये करतच राहणार, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी मनेका गांधी यांनी केली आहे. 

हत्तीणीच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधून अनेक कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरने गर्भवती हत्तीणीच्या हत्येसंदर्भात कठोर कारवाईकरिता याचिका दाखल करण्याची केली मागणी आहे. श्रद्धाने या क्रूरतेच्या विरोधात कठोर कायदा लागू करण्याबाबतच्या याचिकेवर सह्या करण्याचं आवाहन केलं आहे. 

अक्षय कुमारनेही हत्तीणीच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिलं; तोंडातच स्फोट, हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू

केरळमध्ये एक गर्भवती हत्तीण जंगलातून खाण्याच्या शोधात एका गावातील रस्त्यावर आली. त्यावेळी तिला काही लोकांनी अननसातून फटाके खायला दिले. अननसाचं केवळ आवरण होतं आणि त्या आत फटाके ठेवण्यात आले होते. हत्तीणीने ते अननस आहे असं समजून, फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्लं आणि काही वेळातच तिच्या तोंडात स्फोट झाला आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.