उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही; राहुल गांधींचा एल्गार

देशाच्या चौकीदाराने उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांसह भारतीय वायूदलाचा पैसा चोरला.

Updated: Feb 11, 2019, 05:20 PM IST
उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही; राहुल गांधींचा एल्गार title=

लखनऊ: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी प्रियंका गांधी व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यामागील मुख्य हेतू स्पष्ट केला. प्रियंका व ज्योतिरादित्या यांच्याकडे आगामी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी असेलच. मात्र, त्यांचे प्रमुख उद्दिष्ट उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता प्रस्थापित हे असेल, असे राहुल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात काँग्रेसची सत्ता येईपर्यंत मी, प्रियंका आणि ज्योतिरादित्य सिंधिया शांत बसणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले. यावेळी त्यांनी राफेलच्या मुद्द्यावरूनही मोदी सरकारवर टीका केली. देशाच्या चौकीदाराने उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांसह भारतीय वायूदलाचा पैसा चोरला. उत्तर प्रदेश हे भारताचे हृदय आहे. त्यामुळे काँग्रेस याठिकाणी फ्रंटफूटवरच खेळेल, असेही राहुल यांनी सांगितले. 

सोमवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या प्रियंका तीन दिवसांमध्ये दररोज १२ तास वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. याशिवाय, लखनऊमध्ये त्यांची एक सभाही होणार आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधी यांचा हा प्रचार काँग्रेससाठी फायदेशीर ठरण्याची आशा काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे. आजचा रोड शो आटोपल्यानंतर प्रियंका गांधी जयपूर येथे त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. जयपूर येथे सक्तवुसली संचलनालयाकडून (ईडी) रॉबर्ट वढेरा यांची चौकशी सुरु आहे. 

दरम्यान, प्रियंका गांधी यांचा लखनऊमधील आजचा रोड शो हिट ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात २०२२ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या एकूण ४०३ जागांपैकी काँग्रेसला फक्त ७ जागा मिळाल्या होत्या.