Project Cheetah : नामिबीयाहून भारतात आणलेल्या 'साशा'चा मृत्यू; मोठं कारण समोर

Project Cheetah : सहा महिन्यांपूर्वी भारतात मोठ्या कौतुकानं चित्ते आणले होते. देशातून नाहीशी झालेली ही प्रजाती देशात आल्यामुळं आता त्यांना सुरक्षित अधिवास देण्यासाठीच वन्यप्रेमी प्रयत्नशील होते, पण...   

Updated: Mar 28, 2023, 09:47 AM IST
Project Cheetah : नामिबीयाहून भारतात आणलेल्या 'साशा'चा मृत्यू; मोठं कारण समोर  title=
Project Cheetah namibian female cheetah sasha dies latest Marathi news

Kuno National Park: काही महिन्यांपूर्वी भारता मोठ्या कौतुकानं नामिबीयाहून आणलेल चित्ते तुम्हाला आठवतायत का? चित्त्यांना आणण्यासाठीचा थाट आणि त्यानंतर त्यांचं झालेलं स्वागत पाहता या चित्त्यांना कुणी क्वचितच विसरलं असेल. पण, दुर्दैवानं या चित्त्यांमधून एकाचा मृत्यू झाला आहे. (Project Cheetah namibian female cheetah sasha dies latest Marathi news )

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात साधारण सहा महिन्यांपूर्वी नामिबीयाहून भारतात आणलेल्या आठ चित्त्यांपैकी साशा नावाच्या एका मादीचा मृत्यू झाला आहे. किडनीच्या आजारामुळं तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. साडेचार वर्षांहून अधिक वय असणाऱ्या साशाचा मृत्यू होणं Project Cheetah साठी एक धक्कादायक बाब ठरत आहे. 

देशातून लुप्त पावलेल्या चित्त्यांच्या प्रजातीला पुन्हा एकदा नव्यानं संजीवनी देत भारतात त्यांचा अधिवास पुन्हा तयार करण्याच्या हेतूनं Project Cheetah ची सुरुवात करण्यात आली होती. पण, आता मात्र साशाच्या मृत्यूमुळं वन्यजीवप्रेमींनी काही प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. 

भारतात येण्याआधीच आजारी होती साशा? 

मध्य प्रदेशातील मुख्य वन संरक्षक जे.एस.चौहान यांनी साशाचा मृत्यू किडनीशी संबंधित आजारामुळं झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ती भारतात येण्यापूर्वीच किडनीशी संबंधित समस्यांमुळं ग्रासलेली. 22 मार्चला निरीक्षण पथकानं साशा काहीही हालचाल करत नसल्याचं पाहिलं आणि तातडीनं तिला पृथकवास येथे नेण्यात आलं. ज्यानंतर तिच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले. ज्यातून तिच्या किडनीला संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. 

हेसुद्धा वाचा : Toll Tax Hike : मुंबई- पुणे प्रवास महागणार; एक्स्प्रेस वेवरील टोलध्ये मोठी वाढ 

साशाच्या आजाराची माहिती मिळताच भारतीय वन्यजीव संस्थेच्या (डब्ल्यूआयआय) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नामिबीयातील Cheetah Foundation शी संपर्क साधला. ज्यावेळी त्यांना 15 ऑगस्ट 2022 रोजी साशाच्या रक्तामध्ये क्रिएटिनिन स्तर 400 म्हणजेच किडनी निकामी होत असल्याचं कळल्याची माहिती समोर आली. थोडक्यात भारतात येण्याआधीच साशाला हा संसर्ग झाला होता. 

17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नामिबीयाहून आणलेल्या चित्त्यांना वनात सोडण्यात आलं होतं. भारताविषयी सांगावं तर, इथं 1947 मध्ये छत्तीसगढमधील कोरिया जिल्ह्यात देशातील शेवटच्या चित्त्याचा मृत्यू झाला होता. 1952 मध्ये ही प्रजाती देशातून नाहीशी झाल्याची घोषणा करण्यात आली होती.