हिंदू नेत्याच्या हत्येची फेसबूकवर कबुली

पंजाबमध्ये एका गँगस्टरनं फेसबूक पेजवर हिंदू संघर्ष सेनेचे नेते विपिन शर्मा यांच्या हत्येची कबुली दिली आहे.

Updated: Nov 13, 2017, 09:18 PM IST
हिंदू नेत्याच्या हत्येची फेसबूकवर कबुली title=

अमृतसर : पंजाबमध्ये एका गँगस्टरनं फेसबूक पेजवर हिंदू संघर्ष सेनेचे नेते विपिन शर्मा यांच्या हत्येची कबुली दिली आहे. विपिन शर्मा यांची हत्या धर्मासाठी नाही तर बदला घेण्यासाठी केल्याचं हा गँगस्टर फेसबूकवर म्हणाला आहे. ही कबुली दिल्यावर गँगस्टरनं ही फेसबूक पोस्ट लगेच डिलीट केली. सराज संधू असं या गँगस्टरचं नाव आहे.

शर्माला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली आहे. कारण तो मित्राच्या वडिलांच्या हत्येत सामील होता. ज्याला संशय आहे त्यांनी पोलीस रेकॉर्ड तपासावे. जो कोणी मित्राच्या वडिलांच्या हत्येमध्ये सहभागी आहे, त्याला आम्ही सोडणार नाही. हत्येचा संबंध कोणत्याही धर्माशी नाही, असं पोस्ट सराज संधूनं केलं होतं.

पंजाबमध्ये एखाद्या गँगस्टरनं अशाप्रकारे सोशल नेटवर्किंवर गुन्हा कबूल करण्याची ही काही पहिली वेळ नाही. पंजाब पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास ५२ गँगस्टर सोशल मीडियावर आहेत.

३० ऑक्टोबरला भरत नगर भागामध्ये अमृतसर-बटाला रोडवर अज्ञात लोकांनी सोमवारी हिंदू संघटनेच्या नेत्याची गोळी मारून हत्या केली. हिंदू संघर्ष सेनेचे जिल्हा प्रमुख विपिन शर्मा भरत नगरमधल्या मित्राच्या दुकानाबाहेर उभे होते. तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावर एक ढझन गोळ्या झाडल्या. शर्मांना एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये नेल्यावर मृत घोषित करण्यात आलं. शर्मांच्या शरिरावर १५ ठिकाणी जखमा होत्या आणि आठ गोळ्यांचे निशाण होते.