Indian Army : गेल्या काही दिवसांपासून देशभरात थंडीची लाट (Cold Wave) आलीय. त्यामुळे अनेक ठिकाणी दाट धुक्याची (Fog) चादर देखील पसरल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका जाणवत आहे. देशाच्या सीमेवरही मोठ्या प्रमाणात धुके पसरत आहे. याचाच फटका एका भारतीय जवानाला (Indian Army) बसलाय. गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास सीमेवर हा सर्व प्रकार घडला. पंजाबमधील बीएसएफ जवानाने चुकून पाकिस्तानची (Pakistan) आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. हा जवान अबोहर सेक्टरमध्ये बीएसएफच्या (BSF) जीजी चौकीजवळ गस्त घालत होता. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास दाट धुक्यामुळे जवानाची चूकमुक झाली. समोरचे काहीच दिसत नसल्याने तो सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला. त्यानंतर या जवानाला पाकिस्तानी सैनिकांनी अटक केली.
तीन तासांनंतर बेपत्ता झाल्याची माहिती
मात्र सीमेवर कायम तणावपूर्ण परिस्थिती असतानाही पाकिस्तानी सैन्याने मनाचा मोठेपणा दाखवत भारतीय जवानाला बीएसएफकडे सोपवले आहे. धुके इतके दाट होते की, या जवानाच्या इतर साथीदारांनी तीन तासांपर्यंत तो हरवल्याची कोणतीही माहिती नव्हती. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता जेव्हा सर्व सैनिक परतले तेव्हा हा जवान बेपत्ता असल्याचे समोर आले.
बीएसएफच्या 66 बटालियनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या उच्च अधिकाऱ्यांना पाकिस्तानच्या सीमेवर जवान हरवल्याची आणि त्याच्या अटकेची माहिती दिली. पाकिस्तानी रेंजर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला असता त्यांनी बीएसएफ जवान त्यांच्या ताब्यात असल्याची माहिती दिली.
बैठकीनंतर भारतात परतला सैनिक
आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून त्यांच्या भागात पोहोचल्याने सैनिकाला अटक केल्याचे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर बीएसएफ आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मीटिंग करण्यात आली. बैठकीनंतर पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफ जवानाला सोडण्यास सहमती दर्शवली. बीएसएफने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, दुपारी दीड वाजता पाक रेंजर्सनी भारतीय जवानाला बीएसएफकडे सोपवले.