सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्या प्रकरणाचं गुजरात कनेक्शन समोर

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच एक धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 5, 2025, 02:07 PM IST
सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्या प्रकरणाचं गुजरात कनेक्शन समोर title=
समोर आली धक्कादायक माहिती

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे हे तब्बल 26 दिवसानंतर पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याचदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून काढणाऱ्या या हत्याकांडासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचं गुजरात कनेक्शन आता समोर आलं आहे.

गुजरात कनेक्शन आलं समोर

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे घटनेनंतर गुजरातला गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये घुले आणि सांगळे या दोघांनी 3 तारखेपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला होता. मात्र पैसे संपल्याने हे दोघेही पुण्यात आले. एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या. बीडमधील केज येथील वायबसे दाम्पत्याला पोलिसांनी चौकशीला बोलावले आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी घुले आणि सांगळेला पकडण्यात यश आले.

तीन दिवसांपूर्वीच हे तिघे वेगळे झाले

सुदर्शन, सुधीर व नव्याने समावेश झालेल्या सिध्दार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींना केज न्यायालयातून बाहेर काढताच नेकनूर पोलिस ठाण्यात आणले. येथे एसआयटी प्रमुख उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी या तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली. यामध्ये नंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत चौकशी केली. अटक होण्याच्या तीन दिवसांपूर्वीच हे तिघे वेगळे झाले होते, असं तपासामध्ये समोर आलं आहे. 

नक्की वाचा >> Santosh Deshmukh Murder Case: नव्या फोटोने एकच खळबळ; वाल्मिक कराडसोबतची 'ती' व्यक्ती कोण?

...म्हणून अचानक पुण्यात आले

सुदर्शन घुलेजवळ असलेले पैसे दोन ते तीन दिवसांपूर्वी संपले. त्यामुळे कृष्णा आंधळे या लोकांना पैसे देण्यासाठी परत महाराष्ट्रात आला होता. एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता; परंतु त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले. घुले आणि सांगळे एका व्यक्तीला भेटणार होते. परंतु त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. कृष्णा फरार होण्यात यशस्वी ठरला. 

नक्की वाचा >> बीडचा जंगलराज... 'हे' 6 जण वाल्मिक कराडपेक्षाही खतरनाक; फरार आरोपींचा क्राइम रेकॉर्ड पाहाच

गुजरातमध्ये काय केलं?

संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर घुले, आंधळे आणि सांगळे हे तिघेही आरोपी सोबतच होते. रेल्वेने हे तिघेही गुजरातमध्ये गेले. तेथे ते शिवमंदिरात थांबले. जवळपास पंधरा दिवस तिघेही तेथेच राहिले. मंदिरातच जेवण आणि झोपणे अशी त्यांची दिनचर्या होती. 

नक्की वाचा >> 'मातोश्री'वरच्या बैठकीत बाचाबाची! ठाकरे संतापून 'या' नेत्याला म्हणाले, 'तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात'

युट्यूबवर पाहिली हत्या प्रकरणाची बातमी अन्...

सुदर्शन घुलेसह तिघे जण एका रेल्वेस्थानकावर होते. एका व्यक्तीचा मोबाइल घेतला. त्यात देशमुख हत्या प्रकरणाची बातमी यू ट्यूबवर पाहिली होती. तेथूनच त्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. त्यामुळे ते महाराष्ट्रात थांबले नाहीत.