Rafale deal : 'राफेलशिवाय भारत एफ १६ विमानांचा सामना कसा करणार?'

मिग २१ ची कामगिरी चांगली. पण.... 

Updated: Mar 6, 2019, 04:13 PM IST
Rafale deal : 'राफेलशिवाय भारत एफ १६ विमानांचा सामना कसा करणार?' title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : Rafale deal भारतीय वायुसेनेकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या एफ १६ विमानांनी भारताची  हवाई हद्द ओलांडली. ज्यांना परतवून लावण्यासाठी भारताकडून सुखोई आणि मिग २१ बायसन या लढाऊ विमानांची मदत घेण्यात आली. यामध्ये भारत्याच्या एका मिग विमानावर पाकिस्तानच्या एफ १६ने निशाणा साधला. परिणामी पाकच्या या विमानांचा सामना करण्यासाठी मिगऐवजी अद्ययावत कार्यप्रणाली असणाऱ्या राफेल विमानांची उणिव भासल्याचीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. 

मिग २१ या लढाऊ विमानांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. याचविषयी ऍटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी राफेल कराराविषयी सुरु असणाऱ्या पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीदरम्यान एक महतत्त्वाचा मुद्दा मांडला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरू असणाऱ्या तणावाच्या वातावरणाचा आधार घेत त्यांनी ही सर्व परिस्थिती न्यायालयापुढे मांडली. 

राफेल विमानांची भारतीय वायुदलातील लढाऊ विमानांच्या ताफ्यात कशा प्रकारे अतिशय महत्त्वपूर्ण अशी गरज आहे, हा मुद्दा त्यांनी यावेळी अधोरेखित केला. 'नुकत्याच झालेल्या एफ १६च्या आणि अशा अनेक हवाई हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी आपल्याला राफेल विमानांची गरज आहे. राफेलशिवाय आपण त्यांचा सामना कसा करु शकणार?', असं ऍटर्नी जनरल सर्वोच्च न्यायालापुढे म्हणाले. १९६० मधील मिग २१ या लढाऊ विमानाची कामगिरी चांगलीच असल्याचं म्हणत तरीही भारतीय वायुदलात राफेल विमानांचा समावेश झाला पाहिजे ही बाब त्यांनी उचलून धरली.  

पाहा : बालाकोटच्या यशात 'नेत्रा'च्या कटाक्षाचं महत्त्वपूर्ण योगदान

राफेल करारासंदर्भातील कागदपत्रांची संरक्षण मंत्रालयातून चोरी झाल्याचा आरोप ऍटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी केला. याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांनी न्यायालयासमोर यांनी 'द हिंदू' वृत्तपत्रातील काही बातम्यांचा आणि प्राईस निगोशिएन कमिटीतील (पीएनसी) काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा दाखला दिला. ज्यावर ऍटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी तीव्र आक्षेप घेत काही गोष्टी स्पष्ट केल्या. संरक्षम मंत्रालयातून या कराराची कागदपत्र चोरीला जाणं, ही बाब अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असून हा देशाच्या सुरक्षेशी निगडीत असणारा मुद्दा असल्याचं वेणुगोपाल यांनी सांगितलं.