नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज म्हणजेच १९ जून रोजी वाढदिवस असून ते ४८ वर्षांचे झाले आहेत. राहुल गांधी आपला वाढदिवस केवळ मित्र आणि परिवारासोबत साजरा करतात. मात्र, यंदा पहिल्यांदाच राहुल गांधी पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यामुळे आज संपूर्ण दिवस राहुल गांधी पक्ष कार्यालयात राहणार असल्याचं बोललं जात आहे.
राहुल गांधी पक्ष कार्यालयात वाढदिवस साजरा करत असल्याने युथ काँग्रेस, काँग्रेसची महिला आघाडी सोबतच इतरही नेत्यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत असलेल्या राहुल गांधींच्या अशा काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.
१९ जून १९७० रोजी जन्मलेल्या राहुल गांधी यांना खेळात फार रुची आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बॉक्सर विजेंद्र कुमार यांनी राहुल गांधींना खेळात रुची आहे का? असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हटलं की, मला Aikido ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. दिवसातला एक तास मी मैदानात खेळतो. यानंतर विजेंद्रने पुन्हा प्रश्न विचारला, तुम्ही सरावाचे व्हिडिओज शेअर करायला हवेत जेणेकरुन लोकांना प्रेरणा मिळेल. यावर राहुल गांधींनी म्हटलं, "मी नक्कीच असं करेल." तसेच काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींचं सोशल नेटवर्किंग सांभाळणाऱ्या दिव्या स्पंदना या सोशल मीडिया विंगनं राहुल गांधींचे आयकिडो खेळतानाचे फोटो शेअर केले.
राहुल गांधी यांनी ब्रिटनमधील केब्रिज विद्यापीठातून डेव्हलपमेंट स्टडीजमधून एमफिल केलं आहे. त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
राहुल गांधींच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या मते, त्यांना स्टीम मोमोज खाण्याचे शौकीन आहेत.