Indian Railways Special Trains Update: भारतीय रेल्वेने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ पुजेसारख्या महत्त्वाच्या सणांच्या कालावधीमध्ये रेल्वेकडून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा या उद्देशाने भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला असून या निर्णयाअंतर्गत काही शे ट्रेन्स नाही तर तब्बल 6 हजार 556 विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. सणासुदीच्या कालावधीमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी सामावून घेण्याच्या उद्देशाने रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात आल्याचं रेल्वेने म्हटलं आहे.
दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठपूजेसाठी दरवर्षी देशभरातून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक आपल्या मूळ गावी परतात. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत असल्याने मोठ्या संख्येनं येथील स्थानिक लोक देशभरातून आपल्या मूळ राज्यात येतात. सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येने परराज्यातील नागरीक स्वगृही परतात. या काळात रेल्वे तिकीटांना प्रचंड मागणी असल्याने 2 ते 4 महिने अगोदरच तिकीटं काढली तरी ती वेटींग लिस्टवरच असतात. याच परिस्थितीवर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने यावर्षी सणासुदीच्या काळात विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आरामदायी प्रवास घडावा यासाठी गेल्यावर्षी भारतीय रेल्वेने 4429 उत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवल्या होत्या. यावर्षी भारतीय रेल्वेने या संख्येत वाढ केली असून यंदाच्या वर्षी एकूण 6556 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून 346 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. तर, पश्चिम रेल्वेवरून 106 विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मार्गावर मुंबई व पुणे येथून दानापूर, गोरखपूर, बनारस, समस्तीपूर, प्रयागराज, हजरत निजामुद्दीन येथे जाण्यासाठी अनेक रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वे सणासुदीमध्ये तिकीटांच्या अधिकच्या मागणीची दखल घेत ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत एकूण 2315 फेऱ्यांसह 106 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेगाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ईशान्य भारतातून चालवल्या जात आहेत. पश्चिम रेल्वे मुंबईतून देशाच्या विविध भागांमध्ये जाण्यासाठी 14 रेल्वेगाड्या चालणार आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील इंदोर, डॉ. आंबेडकर नगर, उज्जैनबरोबर गुजरातमधील सुरत, उधना, वापी, वलसाड, वडोदरा, अहमदाबाद, साबरमती, हापा, ओखा, राजकोट, भावनगर टर्मिनस येथूनही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.