Crime News : देशाला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीची चप्पल आणि हातातलं कडं कोळसा भट्टीच्या (Coal Furnace) बाहेर सापडल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार (Gangrape) करुन तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलातील कोळसा भट्टीत टाकून जाळून टाकला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, फॉरेंसिक टीम आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झालं असून तपास सुरु करण्यात आला आहे. राजस्थानमधल्या भीलवाडा इथे ही दुर्देवी घटना घडली आहे. याप्रकरणी संशयावरुन चार जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.
बकरी चारण्यासाठी गेली होती मुलगी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीलवाडामधल्या (Bhilwara) कोटडी भाागातील नरसिंहपुरा गावात राहाणारी मृत मुलगी बुधवारी सकाळी आपल्या आईसह जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. दुपारी जेवण बनवण्यासाठी मुलीची आई घरी परतली. पण संध्याकाळी उशीरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी आणि गावातील लोकांनी मुलीचा शोध सुरु केला. पण ती कुठेच सापडली नाही.
मुलीचा शोध सुरु असताना गावातील काही लोकांना जंगलातील कोळसा भट्टी पेटत असलेली दिसली. जवळ जाऊन पाहिल्यावर भट्टीबाहेर मुलीच्या हातातलं कडं आणि तिची चप्पल आढळली. कालबेलिया समाजाने जंगलात चार-पाच भट्ट्या बनवल्या असून जंगलातील लाकूड तोडून ते या भट्ट्यांमध्ये टाकतात. यातली एकच भट्टी पेटत होती.
संशय आल्याने गावकऱ्यांनी भट्टीतली लाकडं बाहेर काढली असता त्यांना धक्का बसला. भट्टीत काही हाडं सापडली. या घटनेने गावात तणावाचं वातावरण आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस अपयशी पडत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. भाजपने याप्रकरणावर गहलोत सरकारवर निशाणा साधला आहे. राजस्थानचे भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी ट्विट करुन राजस्थान सरकारवर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, भीलवाडात घडलेली घटना भयावह होती. 15 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिला कोळसा भट्टीत जिवंत जाळण्यात आलं.
भीववाडात घडलेली ही घटना देशाला हादरवणारी आहे, यावरुन आरोपींना कायदा सुव्यवस्थेचा धाक नसल्याचं दिसंतय, महिलांवरील अत्याचार रोखण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप सीपी जोशींनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. दरम्यान याप्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला असून चार जणांना ताब्यात घेतलं आहे.