नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लढाऊ विमान राफेल आणण्यासाठी ३ दिवसीय पॅरिस दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. ८ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनी भारताला पहिलं राफेल लढाऊ विमान सोपवण्यात येणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिहं यंदा दसऱ्याला फ्रान्समध्ये शस्त्र पुजा करणार आहेत. पॅरिसमध्ये ८ ऑक्टोबरला पहिलं राफेल विमान भारताला मिळणार आहे. त्याच दिवशी राजनाथ सिंह राफेलमधून उड्डाणही करणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते फ्रान्स एयरफोर्सच्या बेसवरुन उड्डाण करणार आहेत.
भारताने लढाऊ जेट निर्माता डसॉल्ट एव्हिएशनसह एक करार केला आहे. त्या करारानुसार, फ्रान्स भारताला ३६ राफेल विमान देणार आहे. त्यापैंकीच एक राफेल विमान आणण्यासाठी संरक्षण मंत्री फ्रान्ससाठी रवाना होत आहेत.
यावर्षी दसरा आणि भारतीय हवाई सेना दिवस, हे दोन्ही दिवस ८ ऑक्टोबर रोजीच येत असल्याने विमान अधिकृतरित्या प्राप्त करण्यासाठी ८ ऑक्टोबर या दिवसाची निवड करण्यात आल्याचं बोललं जातं. फ्रान्समध्ये होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री आणि संरक्षण विभागातील अधिकारी सामील होणार आहेत.
सप्टेंबर २०१६ मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये ३६ राफेल विमान खरेदी करण्याचा करार झाला. या विमानांची किंमत ७.८७ बिलियन यूरो इतकी निश्चित करण्यात आली होती.
राफेल विमानांचा व्यापक तपास आणि पायलटच्या ट्रेनिंगमध्ये अधिक वेळ लागत असल्याने, राफेल भारतात आणण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. राफेल भारतात मे २०२० पर्यंत येण्याची शक्यता आहे.
राफेल फायटर जेटमुळे, भारतीय हवाई सेनेची मारक क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे.