ऐतिहासिक निर्णय, तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले. 

ANI | Updated: Jul 30, 2019, 07:18 PM IST
ऐतिहासिक निर्णय, तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली : अखेर आज राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले. ९९ विरूद्ध ८४ मतांना या विधेयकावर मोहर उमटली. तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. या विधेयकात दुसरुस्त्या सूचविण्यात आल्या होत्या. मात्र, नव्या दुरुस्त्या फेटाळण्यात आल्यात. मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे उपस्थित नव्हते. तसेच टीएसआर, बसपाचे खासदार उपस्थित नव्हते. त्यामुळे हे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेत मंजूर झाले.

दरम्यान, प्रदीर्घ चर्चेनंतर तिहेरी तलाक विधेयक गुरूवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत आले होते. आज त्यावर चर्चा होऊन मतदान घेण्यात आले. विधेयकाच्या बाजुने ९९ तर विरोधात ८४ मते पडलीत. तर त्याआधी लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकाच्या बाजूने ३०३ मते पडली तर विधेयकाच्या विरोधात ८२ मते पडली होती. दरम्यान या विधेयकाला विरोध दर्शवत जदयू, टीएसआर, वायएसआर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला. 

दरम्यान, रविशंकर प्रसाद यांनी या विधेयकावरील चर्चेदरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर २४ जुलैपर्यंत तिहेरी तलाकची ३४५ प्रकरणे समोर आल्याचे सांगितले होते. तसेच हा माणुसकीचा प्रश्न असून आम्हाला मुस्लिम भगिनींची चिंता असल्याचे ते म्हणाले होते. भाजपाने या विधेयकाचे समर्थन करत हे विधेयक म्हणजे महिलांच्या सन्मानासाठी तयार करण्यात आलेले विधेयक असल्याचे म्हटले. यावेळी केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली.