नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'रेप इन इंडिया' वक्तव्यावरून लोकसभेत शुक्रवारी जोरदार गदारोळ झाला. राहुल गांधींनी माफी मागावी, यासाठी भाजपनं लोकसभा डोक्यावर घेतली. तर राहुल गांधींनी माफी मागण्यास साफ नकार दिला. झारखंडच्या प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींनी रेप इन इंडिया असं म्हटलं होतं. त्याची ठिणगी शुक्रवारी लोकसभेत पेटली. भाजपच्या महिला खासदारांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याचा निषेध केला. राहुल गांधी तमाम महिलांची माफी मागावी, अशी मागणी भाजप खासदार स्मृती इराणी यांनी केली.
दिल्ली भारताची रेप कॅपिटल झाल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केलं होतं, याची आठवण राहुल गांधींनी करुन दिली. एवढंच नव्हे तर त्यांनी तो व्हिडिओ देखील शेअर केला. दरम्यान, या सगळ्या वादाबाबत माफी मागण्यास राहुल गांधींनी साफ नकार दिला. ईशान्य भारत जळत असताना तिथल्या आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच जाणीवपूर्वक असे आरोप होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारतात बलात्कारांचं प्रमाण वाढलं असताना, त्यावरून लोकसभेत केवळ असे राजकीय आरोप-प्रत्यारोप व्हावेत, हे दुर्दैवच म्हणावं लागेल.