मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. महात्मा गांधी यांचे छायाचित्र असलेल्या या नोटांच्या दोन्ही बाजूंना कॅपिटलमधील ए हे अक्षर आहे. यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी आणि मुद्रण वर्ष 2017 छापण्यात आलेत.
नवीन नोटा चलनात आल्या असल्या तरी नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या पाचशे रुपयाच्या सध्याच्या नोटाही सुरुच राहणार आहेत असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने ई कॅपिटल अक्षरामधील नोटा चलनात आणल्या होत्या. बनावट नोटांना लगाम घालण्यासाठी या नव्या सिरीजच्या नोटा चलनात आणल्या आहेत.
नवीन पाचशे रुपयांच्या नोटेचा आकार हा नोटाबंदीनंतरच्या पाचशे रुपयांच्या नोटेइतकाच म्हणजे 66 मिमीX150 मिमी इतका आहे. या नोटेचा रंग राखाडी आहे. दरम्यान पाचशेची नवीन नोट चलनात आली असली तरी अधिकतम मूल्याच्या कोणत्याही नव्या नोटा रिझर्व्ह बँक चलनात आणणार नाही. पाच आणि दहा रुपयांच्याही नव्या नोटा सध्या येणार नसल्याचंही बँकेनं स्पष्ट केलंय. मात्र एक रुपयाची नवी नोट आणण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार आहे.