डिसेंबरपर्यंत महागाईपासून दिलासा नाहीच; RBIचे 7 महत्वाचे निर्णय एका क्लिक वर

जवळपास महिनाभरात रेपो रेट दुसऱ्यांदा वाढला आहे. आहे. आजच्या बैठकीत रेपो दरात वाढ करण्याबरोबरच हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

Updated: Jun 8, 2022, 03:20 PM IST
डिसेंबरपर्यंत महागाईपासून दिलासा नाहीच; RBIचे  7 महत्वाचे निर्णय एका क्लिक वर title=

मुंबई : जवळपास महिनाभरात रेपो रेट दुसऱ्यांदा वाढला आहे. आहे. आजच्या बैठकीत रेपो दरात वाढ करण्याबरोबरच इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (RBI MPC June Meet) जूनची बैठक संपली आहे. सोमवार ते बुधवारपर्यंत चाललेल्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  रेपो दर 4.90 टक्के झाला आहे. रेपो दर वाढवल्याचा थेट परिणाम कर्जाच्या ईएमआयवर होणार आहे. यामुळे नवीन कर्जे तर महागतीलच, पण अनेक जुन्या कर्जांचे विशेषत: गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे हप्ते वाढतील.

महागाईमुळे रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात मे महिन्यात तातडीची बैठक घेतली होती. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के केला होता.  रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या महिन्यात सुमारे दोन वर्षांनंतर प्रथमच रेपो दरात बदल केला आणि तब्बल 4 वर्षांनंतर प्रथमच तो वाढवला. अनेक वर्षांपासून महागाईने उच्चांक गाठल्यामुळे रिझर्व्ह बँकेने स्वस्त कर्जाच्या युगातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

आज रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने रेपो दरात वाढ करण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. RBI च्या ताज्या बैठकीत घेण्यात आलेले मुख्य निर्णय खालीलप्रमाणे आहेत...

1 : महागाई अजूनही चिंतेचा विषय आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत (आर्थिक वर्ष 23) म्हणजे डिसेंबरपर्यंत मदत अपेक्षित नाही. या आर्थिक वर्षात किरकोळ महागाई ६.७ टक्के राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. त्याचा दर पहिल्या तिमाहीत 7.5 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 7.4 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 6.2 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.8 टक्के असण्याची अपेक्षा आहे. महागाईच्या वाढीमध्ये खाण्यापिण्याचा वाटा 75 टक्के आहे.

2 : एप्रिल-मे महिन्यात आर्थिक घडामोडींमध्ये सुधारणा झाली आहे. जीडीपी ग्रोथ रेटदेखील सुधारला आहे. 21-22 साठी 8.7 टक्के ग्रोथ रेट असण्याचा अंदाज आहे. एप्रिल-मे दरम्यान उत्पादन क्षेत्रात सुधारणा झाली आहे. याशिवाय सिमेंट, स्टीलचा वापर वाढला आहे. रेल्वेच्या मालवाहतुकीतही वाढ झाली आहे.

3 : या आर्थिक वर्षात रुपयाचे मुल्य घसरले आहे. एप्रिल आणि मे महिन्यातच डॉलरच्या तुलनेत रुपया 2.5 टक्क्यांनी घसरला आहे. निर्यातीत वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढत असतानाही आयात बिल थोडे कमी झाले आहे. परकीय चलनाचा साठा अजूनही $600 अब्जच्या वर आहे.

4: बँकांच्या कर्जाची मागणी वाढली आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक आहे. आव्हानांचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँक कटिबद्ध आहे.

5 : सहकारी बँकांच्या बाबतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. आता नागरी सहकारी बँका (UCBs) लोकांना अधिक कर्ज देऊ शकतील. अशा बँकांसाठी गृहकर्ज मर्यादा 100% वाढवण्यात आली आहे. ग्रामीण सहकारी बँका (RCBs) देखील आता त्यांच्या भांडवलाच्या पाच टक्क्यांपर्यंत गृहकर्ज देऊ शकतील. यासोबतच या बँकांना डोअरस्टेप बँकिंग सेवा सुरू करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

6: आता केवळ बचत खाते किंवा चालू खात्यातूनच नव्हे तर क्रेडिट कार्डवरूनही UPI द्वारे पेमेंट करणे शक्य होणार आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंटची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात RuPay क्रेडिट कार्डने केली जाईल. नंतर, ही सुविधा मास्टरकार्ड आणि व्हिसासह इतर गेटवेवर आधारित क्रेडिट कार्डसाठी देखील सुरू केली जाऊ शकते.

7: यासोबतच रिझर्व्ह बँकेने सबस्क्रिप्शन पेमेंटही सोपे केले आहे. E-Mandate अनिवार्य केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने अशा व्यवहारांसाठी मर्यादा निश्चित केली आहे. आता ही मर्यादा 3 पट वाढवण्यात आली आहे. ओटीपीशिवाय अशा व्यवहारांसाठी 5000 रुपयांची मर्यादा होती. आता 15,000 रुपयांपर्यंतचे E-Mandate व्यवहार OTP शिवाय करता येणार आहेत.