नवी दिल्ली : तुमचं कोणत्याही बँकेत अकाऊंट असेल आणि तुम्हाला या बँकेच्या सुविधांविषयी तक्रारी असतील तर आता तुम्हाला आपली तक्रार नोंदवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. कारण, आता तुम्ही एकाच ठिकाणी तक्रार नोंदवून तुमच्या समस्येवर उपाय मिळवू शकणार आहात. आमचं सहकारी चॅनल 'झी बिझनेस'नं दिलेल्या माहितीनुसार, बँक ग्राहकांच्या तक्रारींसाठी आता खुद्द बँकांची शिखर बँक अर्थात 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' पुढे सरसावलीय. 'आरबीआय'कडून लवकरच एक कम्प्लेन्ट मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच सीएमएस लॉन्च करण्यात येणार आहे. याद्वारे ई-मेल, लिखित पत्रं, सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांतून कोणत्याही बँकेच्या ग्राहकांच्या तक्रारींवर नजर ठेवण्यात येईल. या तक्रारी आरबीआयकडून संबंधित बँका आणि इतर संबंधित संस्थांना धाडण्यात येतील.
तुमच्या बँका तुम्ही केलेल्या तक्रारी कानामागे टाकत असतील तर त्यावर आता ग्राहकांना उपाय सापडलाय, असं म्हणायला हरकत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, आरबीआयचा सीएमएस (CMS) तयार आहे तसंच तो कोणत्याही दिवशी लॉन्च केला जाऊ शकतो.
सध्या तरी बँकांशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी तीन बँकिंग ओम्बुडसमॅनची व्यवस्था आहे. याशिवाय तक्रार यंत्रणाही पूर्णपणे ऑनलाईन नाही. परंतु, आरबीआयच्या या नव्या व्यवस्थेमुळे ग्राहकांना घरबसल्या आपल्या बँकांच्या तक्रारी शिखर बँकेपर्यंत पोहचवता येऊ शकतील. त्यामुळे आरबीआयचा इतर बँकांवरचा वचकही कायम राहायला मदत होईल.
आरबीआयच्या सीएमएसमध्ये ग्राहकांनी तक्रार नोंदवल्यानंतर या तक्रारीवर काय कारवाई झाली हेदेखील ऑनलाईन ट्रॅक करता येऊ शकतील.