वयाच्या साठीत 10 कोटी रुपये हवेयत?, 'अशी' करा गुंतवणुकीची सुरुवात

Retirement Fund Tips: वयात गुंतवणुक करुन मोठा फंड तयार करणे कठीण आहे. त्यामुळे, तुमच्या आयुष्यातील पहिला पगार मिळताच तुम्ही सेवानिवृत्तीच्या नियोजनाचा विचार करून गुंतवणूक सुरू करावी, असा सल्ला तज्ञ देतात. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 9, 2023, 05:54 PM IST
वयाच्या साठीत 10 कोटी रुपये हवेयत?, 'अशी' करा गुंतवणुकीची सुरुवात  title=

Retirement Fund Tips: निवृत्तीचे नियोजन हे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे असते. आपण जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका तुमचा निवृत्ती निधी मोठा असतो. माझा पेन्शन फंड कसा तयार होईल याबाबत अनेक नोकरदार वर्ग चिंतेत असतो. बर्याचदा लोक 30 ते 40 वर्षांच्या वयात असताना याचा विचार करायला घेतात. पण तोपर्यंत आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या येऊन ठेपलेल्या असतात. या वयात गुंतवणुक करुन मोठा फंड तयार करणे कठीण आहे. त्यामुळे, तुमच्या आयुष्यातील पहिला पगार मिळताच तुम्ही सेवानिवृत्तीच्या नियोजनाचा विचार करून गुंतवणूक सुरू करावी, असा सल्ला तज्ञ देतात. 

आजच करा सुरुवात

25 ते 35 वर्षे वयोगटात असताना, आताच नोकरी लागली आहे नंतर गुंतवणूक करु असे तरुण म्हणतात. लोक निवृत्तीचे नियोजन उद्यापर्यंत पुढे ढकलतात. पण जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका मोठा फंड तयार होऊ शकतो. जर तुमचा पगार चांगला असेल आणि तुम्ही 30 ते 40 या वयोगटातील असाल, तर तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत 10 कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता. तुमचे वय 30 वर्षे असेल तर तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी अजून 30 वर्षे शिल्लक आहेत. तुमचे वय 40 वर्षे असल्यास, तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी आणखी 20 वर्षे शिल्लक आहेत.

तुम्ही तुमचा पगार कसा वळवता यावर साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्ही कर्जाचा इएमआय मोठा ठेवलात तर रिटर्न कमी असेल. पण योग्य इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक केलात तर जास्त इंट्रेस्ट मिळेल. तुम्हाला 10 कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी दरमहा 30,000 ते 1.7 लाख रुपये गुंतवावे लागतील.

वयाच्या 30 पासून सुरुवात 

जर तुम्ही जास्त जोखीम न घेतल्यास आणि कर्जामध्ये जास्त गुंतवणूक केली तर तुमचा सरासरी परतावा सुमारे 8 टक्के मिळेल. यानुसार तुम्हाला दरमहा 68-69 हजार रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही संतुलित गुंतवणूकदार असाल, जे इक्विटी आणि डेटमध्ये समान गुंतवणूक करतात, तर तुमचा सरासरी परतावा सुमारे 10 टक्के असेल. या परिस्थितीत दरमहा 46 ते 47 हजार रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही अग्रेसिव्ह गुंतवणूकदार असाल जो प्रामुख्याने इक्विटीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमचा सरासरी परतावा 12 टक्क्यांच्या जवळ असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला दरमहा 30-31 हजार रुपये गुंतवावे लागतील.

वयाच्या 35 पासून सुरुवात 

जर तुम्ही पुराणमतवादी गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला 1 ते 1.1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही संतुलित गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला दरमहा 77-78 हजार रुपये गुंतवावे लागतील. तर, जर तुम्ही आक्रमक गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला दरमहा 55-56 हजार रुपये गुंतवावे लागतील.

वयाच्या 40 पासून सुरुवात

जर तुम्ही उशीरा म्हणजे वयाच्या चाळीशीनंतर गुंतवणुकीला सुरुवात करत असाल तर तुम्हाला 1.6 ते 1.7 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही संतुलित गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला दरमहा 1.3-1.4 लाख रुपये गुंतवावे लागतील. तर, जर तुम्ही आक्रमक गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला दरमहा 1-1.1 लाख रुपये गुंतवावे लागतील. अशा पद्धतीने तुम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्ही 10 कोटी रुपयांचे मालक बनू शकतात.