'ईडी'च्या कार्यालयात चौकशीसाठी रॉबर्ट वढेरांसोबत प्रियंका गांधीही उपस्थित

रॉबर्ट वढेरा यांच्या चौकशीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Updated: Feb 6, 2019, 05:16 PM IST
'ईडी'च्या कार्यालयात चौकशीसाठी रॉबर्ट वढेरांसोबत प्रियंका गांधीही उपस्थित title=

नवी दिल्ली: आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनायलयाने (ईडी) बुधवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना चौकशीसाठी पाचारण केले. रॉबर्ट वढेरा यांच्या चौकशीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. रॉबर्ट वढेरा बुधवारी दुपारी चौकशीसाठी 'ईडी'च्या कार्यालयात हजर झाले. त्यावेळी रॉबर्ट यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रियंका यादेखील हजर होत्या. रॉबर्ट चौकशीसाठी आतमध्ये गेल्यानंतर प्रियंका काही वेळाने येथून निघूनही गेल्या. 

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 'ईडी'कडून वढेरांची चौकशी होणार आहे. लंडनमध्ये वढेरा यांची १.९ लक्ष पौंडांची मालमत्ता असल्याचा संशय आहे. त्यामुळे आम्ही वढेरांना केवळ त्यांच्या लंडनमधील मालमत्तेची माहिती देण्यासाठी बोलावल्याचे 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

यावरून कालपासूनच दिल्लीतील राजकारण तापले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी रात्री काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर लावलेले फलक परस्पर उतरवले. या पोस्टर्सवर प्रियंका गांधी यांच्यासोबत त्यांचे पती रॉबर्ट वढेरा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची छायाचित्रे होती. मात्र, भाजपने पोस्टर्सवर आरोपींची छायाचित्रे असल्याचा आक्षेप घेत ही पोस्टर्स उतरवली. यावरून काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. मोदी सरकार गलिच्छ राजकारण खेळत असून काल रात्री त्यांनी परस्पर पोस्टर्स उतरवून टाकल्याचा आरोप काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी केला होता.