मनाली-लेह मार्गावर उभा राहणार अभियांत्रिकी चमत्कार

 सर्वाधिक उंचीवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा इथे तयार होतोय

Updated: Oct 10, 2018, 04:50 PM IST
मनाली-लेह मार्गावर उभा राहणार अभियांत्रिकी चमत्कार title=

नवी दिल्ली : मनाली लेह महामार्गावर अभियांत्रिकी चमत्कार उभा राहतोय. सर्वाधिक उंचीवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा इथे तयार होतोय. रोहतांग बोगदा... त्यामुळे मनालीवरून लेहला जाण्याचा वेळ कितीतरी कमी होणार आहे.  

सर्वाधिक उंचीवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा

जगातला सर्वाधिक उंचीवरील महामार्ग म्हणजे मनाली ते लेह... या महामार्गावर तब्बल ८.८ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदला जातोय. समुद्रसपाटीपासून तब्बल १०००० फूट उंचीवर या बोगद्याचं बांधकाम सुरू आहे. केवळ हा बोगदा खोदायला तब्बल ८ वर्षांचा कालावधी लागला. बोगद्याच्या एका टोकाला सुंदर हिरवळ तर दुसऱ्या टोकाला बर्फाच्छादीत डोंगर असं याचं स्वरूप आहे.

हा बोगदा कार्यान्वित झाल्यावर मनाली लेह अंतर तब्बल ४० किलोमीटरने कमी होणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे अभियंते यासाठी गेली आठ वर्षे प्रचंड मेहनत घेत आहेत. याचं वार्तांकन करणाऱ्या झी मीडियाच्या टीमला अतिशय सुंदर पण रोमांचकारी अनुभव आहे.

अधिक वाचा : चंदीगड ते लेह... भारत बनवणार सर्वात उंचीवरचा रेल्वेमार्ग!

निसर्गाचं क्षणात पालटणारं रूप

सोलांग व्हॅलीपासून  १२ किलोमीटर अंतरावर रोहतांग बोगद्याच्या दक्षिण दिशेच्या मुखापाशी झी मीडियाची टीम पोहोचली... या बाजूला सुंदर हिरवळ, वृक्षराजी पाहायला मिळाली... अवघ्या १८ मिनिटांचा प्रवास बोगद्यातून केल्यावर आमची टीम बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला जाऊन पोहेचली. मात्र तिथे निसर्गाने आपलं रूप पालटलं. बोगद्याच्या लेहच्या बाजूला बर्फाच्छादीत शिखरं होती. सर्वत्र बर्फच बर्फ होतं. तापमान शुन्याखाली आलं होतं. 

स्पिती व्हॅलीच्या नागरिकांचा बर्फाच्छादीत शिखरांमुळे इतर जगाशी ६ महिने पूर्णपणे संपर्क तुटतो. हा बोगदा झाल्यामुळे त्यांचा मनालीशी बाराही महिने संपर्क राहील. 

सामरिकदृष्ट्याही या बोगद्याचा मोठा फायदा होणार आहे. बोगद्याचं बांधकाम हे एक मोठं आव्हान होतं... इथून वाहणाऱ्या सेरी नाल्याचं पाणी ११० लीटर प्रती सेकंद या वेगाने वाहात असतं. ते कसं थोपवायचं हे एक आव्हान होतं. मात्र बीआरओच्या अभियंत्यांनी ते लिलया पेललं.

मनाली लेह अंतर कमी होणार

४००० कोटींचा खर्च या बोगद्याच्या बांधकामासाठी येणार आहे. त्यातील २०० कोटी रूपये खर्च एकट्या विद्युतीकरणासाठी येणार आहे. अत्याधुनिक वायुविजन यंत्रणा, एलईडी लाईट, अग्निरोधन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक ५०० मीटरवर आपातकालीन निकास या यंत्रणा इथे कार्यान्वित आहेत. भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रात एक मैलाचा टप्पा म्हणून रोहतांग बोगद्याकडे जग पाहणार आहे. २०२० सालापर्यंत या बोगद्याचं काम पूर्ण होऊन तो पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.