₹25 लाख पगार तिघांच्या कुटुंबाला अपुरा! गुंतवणूकदाराचा दावा; म्हणे, 'काही उरत नाही'

Rs 25 Lakh Per Year Salary Package: या व्यक्तीने मांडलेला मासिक खर्चा हिशोब पाहून अनेकांनी आपली मतं व्यक्ती केली आहेत. यावरुन आता दोन गट पडल्याचं दिसत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 13, 2024, 04:12 PM IST
₹25 लाख पगार तिघांच्या कुटुंबाला अपुरा! गुंतवणूकदाराचा दावा; म्हणे, 'काही उरत नाही' title=
सोशल मीडियावर पडले दोन गट (प्रातिनिधिक फोटो)

Rs 25 Lakh Per Year Salary Package: वादग्रस्त गुंतवणूक सल्ल्यांसाठी (कु)प्रसिद्ध असलेल्या एका व्यक्तीने आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. सध्या लोकांना दिल्या जाणाऱ्या पगाराबद्दल मत व्यक्त करताना या व्यक्तीने वर्षाकाठी 25 लाख रुपये पॅकेज असलेल्या नोकरीत तीन सदस्य असलेलं कुटुंब पोसणं कठीण असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. हा अनेकांना अजब वाटलेला दावा करणाऱ्या व्यक्तीचं नाव सौरव दत्ता असं आहे. या व्यक्तीने वर्षाला 25 लाख पगार असेल तर दर महिन्याला हातात येणारा पगार हा दीड लाख रुपये इतका असेल, असं म्हटलं आहे. अत्यावश्यक गोष्टी आणि इतर खर्च, ईएमआय, आरोग्यविषय खर्च आणि आपत्कालीन खर्चाचा विचार केल्यास गुंतवणुकीसाठी हाती काहीच उरत नाही असा दावा सौरवने केला आहे. आता यावर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्यात.

नेमकं म्हणणं काय?

"वार्षिक 25 लाख रुपये पगार हा कुटुंबासाठी फार कमी आहे. 25 ला वार्षिक पगार म्हणजेच दर महिन्याला हातात 1.5 लाख रुपये येणार. तीन सदस्य असलेलं कुटुंब असेल तर महिन्याला 1 लाख रुपये अत्यावश्यक गोष्टींवर खर्च होती. ईएमआय किंवा भाड्यासाठी 25 हजार खर्च होतील. हॉटेलिंग, चित्रपट, ओटीटीचा खर्चही याच 25 हजारातून होईल. त्यानंतर 25 हजार आपत्कालीन आणि आरोग्यविषय गरजांसाठी ठेवले तर गुंतवणुकीसाठी हाती काहीच राहत नाही," असं सौरव दत्ताने म्हटलं आहे.

पडले दोन गट

सोशल मीडियावर या पोस्टवरुन जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांनी वर्षाला 25 लाख पगार हा पुरेसा असल्याचं म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे जीवमान, जीवनशैली महागल्याने, महागाई वाढल्याने आणि आर्थिक प्राधान्य क्रम बदलल्याने खरोखरच वर्षाला 25 लाख रुपये पगार कमी पडतो, असं म्हणत या विधानाचं समर्थन केलं आहे.

अनेकांनी झापलं

पण 25 लाख कमी पडतील म्हणणाऱ्यांची संख्या फारच कमी असून बहुतांश लोकांनी सौरव दत्ताने महिन्याचा खर्च नेमका कसा मोजला आहे याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. "तू एकदा तुझ्या डोक्याची तपासणी करुन घे," असा सल्ला एकाने सौरव दत्ताला महिन्याला 1 लाख दैनंदिन गरजांच्या गोष्टींवर खर्च होतील या विधानावरुन लगावला आहे. "एक कुटुंब औषधांवर महिना 25 हजार खर्च करत असेल तर तेच कुटुंब बाहेर खाणं, भटकंतीसाठी 25 हजार खर्च करणार नाही. तुझ्या फालतू बेरीज वजाबाकीने लोकांना चुकीची माहिती देऊ नकोस," असा टोला लगावला आहे.

अन्य एकाने, "जो कोणी वर्षाला 25 लाख रुपये कमवत असेल त्याला तिघांचं कुटुंब कसं पोसावं हे समजत असणार. घर भाडं, अत्यावश्यक गोष्टी, मनोरंजनाच्या खर्चावर वाटेल ते आकडे दिलेत. आपत्कालीन खर्च महिन्याच्या खर्चात मोजत नाहीत," असं म्हणत या व्यक्तीवर टीका केली आहे.