उर्वशी खोना, झी मीडिया, दिल्ली : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) उल्लेख करत सुप्रीम कोर्टानं शिंदे सरकारला (Maharashtra Government) खडसावलंय. पुण्यातील भूमी अधिग्रहणाच्या एका प्रलंबित प्रकरणाच्या मोबदल्यावरून सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्र सरकारला खडेबोल सुनावले. योजनांसाठी फुकट वाटायला पैसे आहेत पण मोबदला देण्यासाठी नाहीत, असा संताप कोर्टाने व्यक्त केला आहे. यावेळी कोर्टाने लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला. लोकांचे पैसे द्या, अन्यथा लाडकी बहीणबाबत आदेश देऊ, अशी तंबीचं कोर्टानं सरकारला दिलीय. कोर्टाने अनेकदा सरकारला मोबदला देण्याबाबतचे आदेश दिले होते. पण अद्याप मोबदला मिळाला नाही. अखेर कोर्टाने संताप व्यक्त केलाय. तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर मुख्यमंत्री किंवा संबंधित विभाग योग्य ती पावले उचलतील, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय.
मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांना दम
दरम्यान, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडकी बहीण योजनेवरुन मंत्र्यांना दम दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल अशी विधान करू नका असा दमच मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समजतंय. रवी राणांसारख्या आमदारांनी योजनेबाबत केलेलं भाष्य चुकीचं असल्याचं ते म्हणाले. तसंच लोकांमध्ये योजनेबाबत गैरसमज पसरवणाऱ्या आमदारांना वेळीच तंबी देण्याची सूचनाही त्यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
अजित पवार यांचा संवाद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल अमळनेरमध्ये शेतात जाऊन महिलांशी संवाद साधला. यावेळी लाडक्या बहिणींना योजनेबद्दल माहिती दिला. अजितदादांनी लाडकी बहीण योजना कुणाची असा मिश्किल प्रश्न विचारला...त्यावेळी लाडक्या बहिणींनी वेगवेगळी उत्तरं दिलीस एक महिला म्हणाली ही योजना अजितदादांची तर दुसरी बहीण म्हणाली शिंदेंची. त्यामुळे योजना कुणाची यावरून महिलांमध्ये सध्या संभ्रम आहे..
दुसरीकडे, कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून एका व्यक्तीला दम भरलाय. कोरेगाव भागात व्हॉट्सअप ग्रुप मध्ये एका व्यक्तीनं आम्हाला नको तुमचे पंधराशे रुपये आम्हाला मराठा आरक्षण द्या असा मेसेज केला होता. त्यानंतर आमदारांनी त्याला फोन करुन तुला ही योजना नको असेल तर तुझं नाव यातून डिलीट करतो.अशी धमकीच दिली. तर डिसेंबरमध्ये स्क्रुटिणी कमिटीच्या बैठकीत कोण पात्र कोण अपात्र हे ठरणार आहे. यामुळं या इलेक्शनला कोण पुढं पुढं करतोय याची यादी काढा. मग त्यांचा करेक्ट कार्यक्रम करूया, अशी धमकीच दिली. तर यावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय...लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची योजना असून, महिलांचा अपमान सुरू असल्याची टीका राऊतांनी केलीय...