मुंबई : भारतात लवकरच आणखी एका लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. रशियाने तयार केलेल्या स्पुतनिक व्ही (Sputnik V) लसीला पुढच्या काही आठवड्यात मंजुरी मिळू शकते. हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ.रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासोबत स्पुतनिक व्ही लस भारतात तयार करण्यासाठी करार केला होता.
या लसीच्या १ हजार ५०० जणांवर चाचण्या झाल्या आहेत. याचे निकाल एप्रिलमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. भारतीय औषध महानियंत्रक मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या लसीच्या ट्रायल भारतात सुरू झालेल्या.
स्पुतनिक व्ही लसीचेही २ डोस घ्यावे लागतात. पहिल्या डोसच्या २१व्या दिवशी दुसरा डोस घ्यायचा असतो. त्यानंतर साधारण २८ ते ४२व्या दिवसांनंतर तुमच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी तयार व्हायला सुरूवात होते.
भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस दिली जात आहे. आतापर्यंत देशात ६ कोटींहून अधिकांचं लसीकरण पूर्ण झालेले आहे. या दोन लसींसोबत आणखी एका लसीला मान्यता मिळाल्यास लसीकरणाच्या मोहीमेला वेग येईल.
याशिवाय सीरम इन्स्टिट्यूचे सीईओ अदर पुनावाला यांनीही नुकतंच एका लसीबाबत मोठी घोषणा केली होती. अमेरिकी कंपनी नोव्हावॅक्ससोबत (Novovax) भागीदारीने सीरम इन्स्टिट्यूट कोव्होवॅक्स (Covovax) लसीची भारतात निर्मिती करणार आहे. सप्टेंबरपर्यंत ही लस लाँच होण्याची आशा पुनावाला यांनी व्यक्त केली आहे.