Sainik School Admission 2024: सैनिक शाळांची देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये गणना होते. मात्र या शाळेत प्रवेश घेण्यासाठी कठिण परीक्षा द्यावी लागते. अर्जदारांची संख्या जास्त असल्याने दिवसेंदिवस स्पर्धादेखील कठिण होत जाते. सैनिक शाळांची स्थापना 1961 मध्ये सैन्यात प्रवेश करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना शैक्षणिक, शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या तयार करणे या उद्देशाने सुरू झाली होती. तुम्हालाही तुमच्या मुलासाठी सैनिकी शाळेत अॅडमिशन घ्यायचे आहे तर या कोट्यातून तुम्ही शाळेत प्रवेश घेऊ शकता. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
सैनिक शाळेत प्रवेशासाठी सर्वात आधी एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. यात इयत्ता पाचवीसाठी गणित, जीके (एससी आणि एसएसटी), भाषा आणि इंटेलिजेंस या विषयांचा समावेश आहे. तर, इयत्ता नववीसाठी गणित, बुद्धी, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र आणि त्यानंतर मुलाखत व वैद्यकीय चाचणी घेतली जाते. सैनिक शाळेत इयत्ता पाचवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारेच प्रवेश मिळतो. तर, अकरावीच्या प्रवेशासाठी दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो.
सैनिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 31 मार्च रोजी 10 ते 12 वर्षांपर्यंत असायला हवे. तर, इयत्ता नववीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 31 मार्च रोजी 13 ते 15 वर्षांपर्यंत असायला हवे.
- सैनिक शाळेत प्रवेशासाठी 67 टक्के हे त्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशच्या रहिवाशांसाठी राखीव आहे जिथे ती शाळा आहे.
- 33 टक्के जागा अन्य राज्यांतील उमेदवारांसाठी राखीव आहे.
- सैनिक शाळेत प्रवेश गृहराज्य, केंद्रशासित प्रदेश आणि अन्य राज्य/ केंद्र शासित प्रदेशाच्या राखीव कोट्यातील प्रत्येक श्रेणींतर्गंत होते. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
a) 15 टक्के जागा अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी आरक्षित आहेत
b) अनुसूचित जनजाती (एसटी) प्रवर्गासाठी 7.5 टक्के जागा आरक्षित आहेत.
c) केंद्रीय लिस्टनुसार, नॉन क्रीमी लेयर (ओबीसी-एनसीएल) संबंधित सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 27 टक्के जागा राखीव आहेत. अशा प्रकारे, वरील धर्तीवर सैनिक शाळेतील 49.50% जागा राखीव आहेत.
d) सैनिक शाळेतील गृहराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि इतर राज्य/केंद्रशासित प्रदेश कोट्यातील उर्वरित 50.50% जागांपैकी 25% जागा संरक्षण कर्मचारी आणि माजी सैनिकांसाठी राखीव आहेत.
प्रत्येक सैनिक शाळेतील सहावीच्या एकूण जागांपैकी 10% किंवा 10 जागा मुलींसाठी राखीव आहेत.
सैनिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अर्ज आणि प्रॉस्पेक्टस जारी केले जातात. ज्या विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे त्यांना त्या संबंधित शाळेतून अर्ज घेता येईल. अर्ज करण्याची प्रक्रिया सैनिक स्कूलच्या अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर ऑनलाइन सुरू होते.