रायपूर : छत्तीसगडच्या बलौदाबाजार भागात रस्त्याची मागणी करताना काही शालेय विद्यार्थी आंदोलन करत होते. याच रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांची विकास यात्रा निघणार होती. परंतु, आंदोलनाला बसलेल्या मुलांनी रस्त्यावरून हटण्यासाठी नकार दिल्यानं उप विभागीय दंडाधिकाऱ्यांनीच (SDM) मुलांवर लाठीचार्ज सुरू केला. शाळेत जाण्यासाठी रस्त्याची मागणी करत या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं.
बलौदाबाजार भागात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. यानंतर नागरिकांनी पोलिसांवर हल्लाबोल केलाय. सोबतच दंडादिकारी तीर्थराज अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केलीय.
आयटीआय भवनासमोर आपल्या शाळेसमोर रस्ता बनवण्याची मागणी करत विद्यार्थी आंदोलनाला बसले होते... परंतु, या मुलांना पाहताच तीर्थराज यांच्या पारा चढला. त्यांनी पोलिसांना या विद्यार्थ्यांना हटवण्याची सूचना दिली... परंतु, रस्त्यावरून हटण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यांना तीर्थराज यांनी स्वत: पोलिसांचा दंडुका हातात घेत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज सुरू केला.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मात्र तीर्थराज यांची गोची झालीय. याआधीही ते अनेकदा वादात अडकलेत. काँग्रेसनं विद्यार्थ्यांशी क्रूर वागणाऱ्या या उप-विभागीय दंडाधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी केलीय.