ब्रमाडिन्हो : शुक्रवारी ब्राझिलच्या एका धातूच्या खाणीचा बांध अचानक फुटल्यानंतर ३०० हून अधिक जण बेपत्ता झालेत. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ५८ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. यापूर्वी आणखीन एक बांध तुटल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं शोध आणि मदत मोहीम थांबवावी लागली होती. खाणीच्या मलब्याखाली जवळपास पाच हजार घरं गाडली गेली. हायवेवरही १० फूटापर्यंत मलबा साचलाय.
आजुबाजूच्या परिसरातील स्थानिकांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुर्घटनेनंतर बांधाच्या जवळपास ८०० मिलियन गॅलन पाणी भरलं. परंतु, काही वेळात सुरक्षा रक्षकांनी त्यावर नियंत्रण मिळवलं.
शनिवारी दुपारपर्यंत ४० मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यांना तत्काळ नजिकच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सुरक्षा रक्षकांनी शनिवारी जवळपास ४३ जणांना जीवंत बाहेर काढलं.
उल्लेखनीय म्हणजे, सप्टेंबर २०१८ मध्ये जर्मनीची मायनिंग एक्सपर्ट कंपनी तुवे सूदनं फिजायो बंधाऱ्याची चौकशी करत त्याला क्लिअरन्स दिला होता. सरकारी पर्यावरण संरक्षण एजन्सी इबामा यांनी खाणीच्या मालकाला ४७५ करोड रुपयांचा दंड ठोठावलाय. सरकारनं या कंपनीच्या बँक खात्यांनाही फ्रीज केलंय. 'ग्रीनपीस'नं ही दुर्घटना म्हणजे पर्यावरणीय गुन्हा असल्याचं म्हटलंय.