राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदावरून मतभेद? जंयत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार का?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रदेशाध्यपदावरून पक्षामध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 9, 2025, 07:49 PM IST
राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदावरून मतभेद? जंयत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार का? title=

Nationalist Congress Party : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात पदाधिकारी बदलाचे वारे वाहायला लागलेत. पक्षाच्या आढावा बैठकीत आगामी काळात पक्षात संघटनात्मक बदल होतील असे संकेत सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेत. मात्र दुसरीकडे प्रदेशाध्यपदावरून पक्षामध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय. काय आहेत पक्षातील नेत्यांच्या भावना. पाहूयात सविस्तर 

प्रदेशाध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत मतभेद?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात काही संघटनात्मक बदलांचे वारे वाहू लागलेत.  मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आगामी काळात पक्षात संघटनात्मक बदल होतील, असे संकेत स्वतः शरद पवार यांनी दिलेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालीय. आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष बदलाची गरज असल्याचं सुचवल्याचं पाहायला मिळालं.

तर ज्या पदाधिकाऱ्यांच्या दोन ते तीन टर्म झालेत त्यांनी शरद पवार यांच्याकडे राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे इतर नेत्यांना संधी मिळेल असं म्हणत विकास लवांडे यांनी ही जयंत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी अप्रत्यक्ष मागणी केली आहे. 

प्रदेशाध्यक्षपदी जंयत पाटील कायम राहणार

रोहित पवार आणि विकास लवांडे यांसारखे शरद पवार यांच्या पक्षातील नेते नेतृत्वबदलासंदर्भात मागणी करत असताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष असतील असं म्हटलंय. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात प्रदेशाध्यक्षपदावरून मदभेत असल्याचं पाहायला मिळतंय. 

शरदचंद्र पवार पक्षातील अनेक नेते शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत महायुतीत गेले आहेत. शरद पवार यांच्या हातून त्यांचा पक्ष आणि चिन्हही गेलं आहे. मात्र, शरद पवार यांनी हार न मानता आपला लढा सुरू ठेवलाय. मात्र, दुसरीकडे पहिली फळी पक्ष सोडून गेल्यानं सध्याच्या नेत्यांमध्ये पहिल्या फळीत कोण यावरून सुप्त संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.