भारतात आढळला दुर्मिळ ब्लॅक पँथर; 'बघीरा'च्या दर्शनानं भारावले नेटकरी

अतिशय रुबाबात वावरणाऱ्या.... 

Updated: Jul 7, 2020, 01:42 PM IST
भारतात आढळला दुर्मिळ ब्लॅक पँथर; 'बघीरा'च्या दर्शनानं भारावले नेटकरी  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

बंगळुरू : सोशल मीडियावर दर दिवशी असंख्य व्हिडिओ, मीम्स आणि फोटो व्हायरल होत असतात. त्यावर शेकड्यानं प्रतिक्रियाही येत असतात. पण, काही तासांपासून याच सोशल मीडियाच्या जंगलामध्ये असा एक प्राणी रुबाबात वावरत आहे, ज्याला पाहून सारेच भारावले आहेत. 

'अर्थ' या नावे असणाऱ्या एका ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या या अतिदुर्मिळ प्रजातीच्या प्राण्यानं साऱ्यांनाच भुरळ पाडली असून, थेट 'मोगली' या लोकप्रिय कार्टूनची आठवण सर्वांना करुन दिली आहे. भारतातील कर्नाटक येथे असणाऱ्या काबिनीच्या जंगलामध्ये हा ब्लॅक पँथर फिरताना दिसला, अशा कॅप्शनसह हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. ज्याला आतापर्यंत असंख्य लाईक्स आणि रिट्विट मिळाले आहेत. 

जंगलांमध्ये स्वच्छंद वास्तव्य करणारा आणि अतिशय रुबाबात वावरणाऱ्या या ब्लॅक पँथरला पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं असं म्हणायला हरकत नाही. शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये तर हा रुबाबदार प्राणी थेट कॅमेऱ्याच्या लेन्समध्येच एकटक पाहताना दिसत आहे. झाडाआडून त्याची ती रोखलेली नजर शब्दांत मांडणं कठीणच. 

कोणी टीपली ही अद्वितीय छायाचित्र? 

सूत्रांचा हवाला देत डीएनएनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार भारतीय वन्यजीव छायाचित्रकार Shaaz Jung यांनी २०१९ मध्ये हे दृश्य टीपलं होतं. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवरही ही छायाचित्र शेअर केली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते या प्रजातीच्या प्राण्यांची एक झलक टीपण्यासाठी देशातील विविध जंगलांच्या वाटांवर निघाले आहेत. 

 

नेटकऱ्यांना भेटला खराखुरा 'बघीरा'

नेटकऱ्यांपर्यंत हा ब्लॅक पँथर पोहोचला तो म्हणजे थेट त्यांच्या आवत्या 'बघीरा'च्या रुपात. सर्वांनीच अगदी उत्साहात प्रतिक्रिया देत हे सत्य आहे की स्वप्न हेच उमगत नसल्याचं म्हणत या सुरेख छायाचित्रांना दाद दिली.